निरुखे प्रकरण - ‘तो’ छापा टीप देऊनच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सावंतवाडी - निरुखे माणगाव येथील रामदास करंदीकर यांच्याकडे चार कोटी रुपयांची रोकड असल्याची टीप मिळाल्याचे सांगत बनावट आयकर विभाग पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखली होती, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासिक अंमलदार तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी दिली.

सावंतवाडी - निरुखे माणगाव येथील रामदास करंदीकर यांच्याकडे चार कोटी रुपयांची रोकड असल्याची टीप मिळाल्याचे सांगत बनावट आयकर विभाग पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखली होती, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासिक अंमलदार तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी दिली.

या प्रकरणात पोलिसांनाच गंडा घालणाऱ्या त्या टोळक्‍यापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. या तपासाचे दोन भाग केले असून, गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक काळात कणकवलीत छापा
या टोळक्‍याने निवडणूक काळात कणकवलीत छापा टाकला होता, असे तपासात पुढे येत आहे. प्राथमिक चौकशी करताना त्यातील एकाने कबुली दिली, असे गवस यांनी सांगितले.

पोलिस उपनिरीक्षक पवार निलंबित

सिंधुदुर्गनगरी - निरुखे येथील रामदास करंदीकर यांच्याकडे छापा टाकणाऱ्या बोगस पथकाला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मदत केल्याचे चौकशीत उघड झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक दीिक्षतकुमार गेडाम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यालयातील सायबर सेल शाखेचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांना निलंबित, तर उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली.

कुडाळ येथील व्यापारी करंदीकर यांच्या निरुखे येथील निवासस्थानी केंद्रीय आयकर अधिकारी असल्याचे भासून पोलिसांसमवेत त्या बोगस पथकाने छापा टाकून सुमारे साडेसात लाखांची लूट केली होती. जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही त्यांच्या सोबत होते. २२ एप्रिलला घडलेल्या याप्रकरणी करंदीकर यांना अवैध रक्कम, डिझेल व पेट्रोलचा साठा करणे या गुन्ह्यात अटक केली होती.

२३ एप्रिलला करंदीकर हे जामिनावर सुटल्यावर त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला होता. पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी चौकशी केली असता हा छापा नसून बनावट अधिकारी बनून आलेल्या टोळीने पोलिसांना फसवून घातलेला दरोडा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात भामट्यांना सहाय्य केलेल्या पोलिसांची चौकशी झाली आहे.

‘तो’ अधिकारी नामानिराळा
उपलब्ध माहितीनुसार हे बोगस पथक जिल्ह्यातील एका बड्या अधिकाऱ्याच्या सगळ्यात आधी संपर्कात आले होते. ‘त्या’ अधिकाऱ्याने त्यांनी एलसीबीला जोडून दिले. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याने फार शहानिशा न करता पोलिस बोगस पथकासोबत गेले. पोलिस अधीक्षक याची चौकशी करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Sindhudurg News Nirukhe case