पंचनामा करा नाहीतर मालवणात येतो - नीतेश राणे यांचा मत्स्य आयुक्तांना इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा न केल्याने आमदार नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन तासात या नुकसानीचा पंचनामा न केल्यास मालवणात येऊन याचा जाब विचारू, असा इशारा आमदार राणे यांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांना दिला.

मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत कर्नाटक मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सनी घुसखोरी करत येथील स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले; मात्र याचा मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा न केल्याने आमदार नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दोन तासात या नुकसानीचा पंचनामा न केल्यास मालवणात येऊन याचा जाब विचारू, असा इशारा आमदार राणे यांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांना दिला.

दोन दिवसांपूर्वी येथील समुद्रात मासेमारीस गेलेल्या दांडी येथील लिओ काळसेकर यांच्या मासेमारीच्या जाळ्यांचे परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी नुकसान केले. यात काळसेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग असमर्थ ठरल्याने याप्रश्‍नी आज येथील पारंपरिक मच्छीमारांनी कणकवली येथे आमदार नीतेश राणे यांची भेट घेत लक्ष वेधले.

यावेळी ज्येष्ठ मच्छीमार नेते कृष्णनाथ तांडेल, नितीन आंबेरकर, संतोष देसाई, आबा सावंत, लिओ काळसेकर, बबलू मोंडकर, आबू हडकर, भगवान मुंबरकर, लक्ष्मीकांत सावजी, ध्रुवबाळ फोंडबा, भाऊ जोशी, नितीन परुळेकर, भाऊ मोरजे, नामदेव केळुसकर, गौरव प्रभू, संतोष नेवाळे, शेखर तोडणकर, रवी चांदरकर, आबा मोंडकर यांच्यासह अन्य पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते. 

गेली पाच वर्षे गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासळीची लूट सुरू ठेवली आहे. त्यांच्या ट्रॉलिंग पद्धतीच्या दिवस-रात्र मासेमारीमुळे येथील स्थानिक मच्छीमारांची "न्हय'ची जाळी तुटून नाहीशी झाली आहे. त्यामुळे हे हायस्पीड ट्रॉलर्स स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना देशोधडीला लावत आहेत. मत्स्योद्योग खात्याकडे याबाबतच्या तक्रारी देवूनही मत्स्य व्यवसाय खाते ढिम्मपणे बघ्याची भूमिका घेत आहे. पोलिसांकडून स्पीड बोटीद्वारे गस्त घातली जाते; परंतु त्यांना बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना पकडण्याचे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे मच्छीमारांच्या दृष्टीने समुद्रावरील गस्त न घातल्यामुळे सागरी मासेमारी नियम अधिनियम व कायदे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी बासनात गुंडाळून जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. स्थानिक मच्छीमारांच्या व्हेसल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नमुना क्रमांक पाच इन्शुरन्स पॉलिसी इत्यादी सर्व कायदेशीर कागदपत्रे बंदराच्या बाहेर पडल्याबरोबर पंधरा मिनिटात तपासण्याचे तपासकाम फक्त मत्स्य व्यवसाय खाते करत आहे; परंतु ज्याच्याकडे एकही दाखला नाही त्या परराज्यातील ट्रॉलर्सना मात्र कोणी काहीही विचारत नाही किंवा त्यांना बंदरात आणून दंडही करत नाहीत.

राज्यातील मच्छीमार उपासमारीने मरत असताना शासन मात्र कायद्याची अंमलबजावणी न करता मच्छीमारांची जाळी तोडून नेणाऱ्या व उपासमारीची वेळ आणलेल्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ज्वलंत प्रश्‍नासंदर्भात मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन अशा विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्याची विनंती करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी आमदार राणे यांच्याकडे केली. 

हायस्पीड ट्रॉलर्स धारकांकडून स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होऊनही मत्स्य व्यवसाय खात्याने त्याचा पंचनामा न केल्याने संतप्त बनलेल्या आमदार राणे यांनी मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नुकसानीचा पंचनामा तत्काळ न केल्यास मालवणात येऊन याचा जाब विचारू असा इशारा राणे यांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांना दिला.

येत्या 13 ला आनंदवाडीत मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर येत असून या दौऱ्यात हायस्पीड नौकांच्या घुसखोरी संदर्भात त्यांचे लक्ष वेधू अशी ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी पारंपरिक मच्छीमारांना दिली.

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Comment