नगरपंचायतीचे उमेदवार नारायण राणेच ठरविणार - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर येथील नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असल्याने शहरातील सर्व १७ प्रभागातील उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवारांचा ‘फैसला’ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच करणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.

कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर येथील नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असल्याने शहरातील सर्व १७ प्रभागातील उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवारांचा ‘फैसला’ माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच करणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.

येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मार्च २०१८ अखेरीस होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनीही आपापल्या प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार नीतेश राणे यांना विचारणा केली असता, शहरात अद्याप कुठल्याच प्रभागातील उमेदवारांची निश्‍चिती झालेली नाही. तर कुणाला तिकीट द्यायचे याबाबतचा अंतिम निर्णय नारायण राणे हेच ठरवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राणे यांनी आजवर जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवार निश्‍चिती करताना नेहमीच धक्‍कातंत्र वापरले आहे. त्यामुळे अमुक प्रभागात आपणालाच तिकीट मिळाले असे कुणी सांगत असेल तर तो त्याचा भ्रम असेल असेही राणे म्हणाले.

राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर हा पक्ष, स्वतः:चे चिन्ह घेऊन कणकवलीत प्रथमच मतदारांसमोर जाणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या दृष्टीने या निवडणुकीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागणार आहे. त्यामुळे सर्व १७ प्रभागातील उमेदवारांची निवड काळजीपूर्वक केली जाणार आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठीही सक्षम उमेदवार दिला जाणार आहे. नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे स्वतः श्री. राणे यांच्याकडे असून आम्ही कुणीही यात हस्तक्षेप करणार नसल्याचेही आमदार राणे पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना म्हणाले.

मतभेद नाहीत...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील कुठल्याच कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद नाहीत. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष राणे हे सर्वांना घट्ट जोडून ठेवणारे फेविकॉल असल्याने या पक्षातून कुणी अन्यत्र जाण्याचा प्रश्‍नच नाही. मात्र आगामी कालावधीत शिवसेनेतून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते स्वाभिमानमध्ये येतील, असे आमदार राणे म्हणाले.

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Comment