बदनामी न थांबविल्यास केसरकरांना नोटीस देणार - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची ‘ईडी’तर्फे चौकशी सुरू असल्याची जाहीर माहिती दिली. त्यांनी ज्या न्यायालयात दावा आहे, तेथील पुरावे द्यावेत; अन्यथा आमची बदनामी थांबवावी. तसे न झाल्यास आम्हाला कायदेशीर नोटीस द्यावी लागेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांची ‘ईडी’तर्फे चौकशी सुरू असल्याची जाहीर माहिती दिली. त्यांनी ज्या न्यायालयात दावा आहे, तेथील पुरावे द्यावेत; अन्यथा आमची बदनामी थांबवावी. तसे न झाल्यास आम्हाला कायदेशीर नोटीस द्यावी लागेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

त्यांनी टीका केली, की केसरकर राक्षसी मनोवृतीचे आहेत. त्यांनी आमच्या घरात डोकावण्यापेक्षा जिल्ह्याच्या नियोजनातील निधीला कात्री कशी लागली, याकडे लक्ष द्यावे. आपले अर्थ नसलेल्या राज्यखात्यातील आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळीकतेचा फायदा घेऊन निधी आणून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

ते म्हणाले, ‘‘आम्हाला चौकशीची भीती नाही. मुळात तसे पुरावे तरी केसरकरांनी द्यावेत. केवळ बातमीची हेडलाईन होण्यासाठी राणेंवर टीका करण्याचा त्यांचा उद्योग आहे. ज्यांना ईश्‍वरी संकेत समजतात, त्यांनी आपल्या पक्षातील शिवसैनिकांच्या भल्यासाठी तरी काही करावे. जिल्ह्यासाठी २७०० कोटी आणले सांगता; मग निधी गेला कोठे? रस्त्यांची दुरवस्था का आहे? प्रशासनावर तुमचा वचक राहिला नाही, हे जनतेला कळले आहे. केवळ राणेंवर बोलायचे आणि वेळ मारून न्यायची ही पद्धत आहे. तलाठ्यांकडून सातबारा मिळत नाहीत, याचा जाब कोण विचारत नाही. भातशेतीच्या नुकसानीकरिता जिल्ह्यासाठी एकच निकष वापरावा, याबाबत मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि कमी झालेल्या निधीबाबतही आम्ही येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत. जिल्हा नियोजनच्या बैठकीतही पालकमंत्र्यांना उत्तर द्यावे लागणार आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘गोवा सरकारने जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्याचे बिल राज्य सरकार देणार आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळतील, यासाठी भाजपच्या मंडळींनी जे प्रयत्न केले, याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण, या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यात एखादे मोठे रुग्णालय व्हावे, यासाठीही प्रयत्न करावा.’’ गोव्यासारख्या राज्यावर किती दिवस अवलंबून राहणार, असा खोचक सवालही त्यांनी केला. 

राजकीय चित्र बदलण्याची प्रतीक्षा
कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत आम्ही काहीही विचार केलेला नाही. याचे कारण येत्या काळात केंद्र आणि राज्यात काही घटना घडणार आहेत. त्यानंतर अनेक राजकीय बदल तुम्हाला दिसतील. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश, गुजरातच्या निवडणुकांचे निकाल आणि राज्यातील सत्तेतील सरकार पाठिंब्याची शिवसेनेची भूमिका हे विषय जिल्ह्याच्याही राजकारणाला कलाटणी देणारे असतील, असे सूतोवाचही नीतेश यांनी केले.

महाराष्ट्र स्वाभिमान- भाजप जवळीकतेचे संकेत
राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेने भाजपच्या विरोधात सातत्याने पाऊल टाकले आहे. सरकारच्या विरोधात काम करणाऱ्यांबरोबर भाजपने का मैत्री ठेवावी? जिल्ह्यातील सत्तेत सहभागी होण्यासाठी यापूर्वी नारायण राणे यांनी भाजपला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले होते. तेही तुम्हाला आता मिळू शकते, असा संकेत नीतेश यांनी एका प्रश्‍नला उत्तर देताना दिला. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान आणि भाजपची लवकरच जवळीक असेल, असे चित्र निर्माण झाले आहे. 

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Press