पोलिसांच्या दडपशाहीविरुद्ध २० ला मोर्चा - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दबावापोटी येथील मच्छीमारांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांचा अन्याय सहन करणार नाही. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात येत्या २० ला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

मालवण - गोव्यातील पर्ससीन नेटचे ट्रॉलर्स पकडल्यानंतर स्थानिक मच्छीमारांवर पोलिसांकडून झालेली कारवाई ही चुकीची आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दबावापोटी येथील मच्छीमारांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांचा अन्याय सहन करणार नाही. पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात येत्या २० ला तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा माजी खासदार व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

दरम्यान, गोव्यातील पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर तसेच त्यांच्या मालकांवरही कडक कारवाई व्हायला हवी. हे तिन्ही ट्रॉलर्स या बंदरातून बाहेर गेल्यास हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथील पोलिस ठाण्यास भेट देत सहायक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्याशी चर्चा केली. अटकेत असलेल्या गोपीनाथ तांडेल, जोसेफ नऱ्होंना यांची भेट घेतली. त्यानंतर नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मंदार केणी, सुदेश आचरेकर, बाबा परब, प्रीतेश राऊळ, कृष्णनाथ तांडेल, राजू बिडये, अभय कदम, मंदार लुडबे, सनी कुडाळकर, छोटू सावजी, दीपक पाटकर, भाई मांजरेकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधव उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ‘‘मच्छीमारांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर आपण पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रत्यक्षात या प्रकरणाचे गौडबंगाल काय आहे, पोलिस अधीक्षकांवर कोण दबाव टाकत आहे याचा अंदाज आम्ही घेतला आहे. पोलिस अधीक्षक गेले दोन दिवस स्थानिक मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांना देत असलेली वागणूक ही निषेधार्थ आहे.

गोव्यातील ट्रॉलर्स व्यावसायिकांनी ज्याने खंडणी मागितली त्याचा तपास न करता ज्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे पोलिस 
अधीक्षकांनी दबावापोटी ही कारवाई केल्याचे सिद्ध होत आहे.’’ 
परराज्यातील ट्रॉलर्सवरून प्रकाश झोतातील मासेमारी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गोव्यातील ट्रॉलर्स धारकांवरही पोलिस अधीक्षकांनी कारवाई करायला हवी. याची कार्यवाही पोलिस अधीक्षकांकडून न झाल्यास जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाच्यावतीने संघर्ष काय असतो ते दाखवून देऊ.

पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढताना पोलिस परेड कसली काढतात? कोण आतंकवादी येथे घुसले होते काय? आमचा आक्षेप स्थानिक पोलिसांवर नसून जिल्हा पोलिस अधीक्षकांवर आहे. पोलिस अधीक्षक येथे आल्यानंतरच या सर्व घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षकांची हुकुमशाही, दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे अनेक पोलिस अधीक्षक आले आम्ही कोणालाही भीक घातली नाही. स्थानिक मच्छीमारांच्या अंगावर जात असाल तर त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

गोव्यातील पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई व्हायला हवी. या ट्रॉलर्संच्या मालकांवरही फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. हे ट्रॉलर्स येथील बंदरातून बाहेर गेल्यास हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल करताना काही जणांची नावे दिली आहेत. प्रत्यक्षात ही नावे कोणी दिली हे स्पष्ट केलेले नाही. पोलिस यात कोणाचीही नावे देतील ते आरोपी आहेत का? यावरून पोलिसांचा तपास हा चुकीच्या दिशेने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारभाराच्या विरोधात २० ला शहरातील भरड नाका ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा केवळ ट्रेलर असेल त्यानंतरही स्थानिक मच्छीमारांवर अन्याय सुरूच राहिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

Web Title: Sindhudurg News Nitesh Rane Press