केर भेकुर्लीवासिय पुन्हा एसटीच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

दोडामार्ग - केर भेकुर्ली रस्त्याचे दुखणे संपता संपत नाही, अशी स्थिती आहे. संततधार पावसामुळे भेकुर्ली रस्त्यात तीन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता बंद होऊन भेकुर्लीला जाणारी वस्तीची एसटी रद्द करण्यात आली.

दोडामार्ग - केर भेकुर्ली रस्त्याचे दुखणे संपता संपत नाही, अशी स्थिती आहे. संततधार पावसामुळे भेकुर्ली रस्त्यात तीन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता बंद होऊन भेकुर्लीला जाणारी वस्तीची एसटी रद्द करण्यात आली.

भेकुर्ली अती उंचावरील गाव. गेल्या अनेक वर्षांपासून तेथील ग्रामस्थ दळणवळणाच्या सुविधेपासून वंचित होते. त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केर भेकुर्ली रस्ता मंजूर झाला; पण सुरवातीपासूनच अनेक अडथळे उभे राहिले. त्यावर मात करत शेवटी एकदाची वस्तीची गाडी भेकुर्लीत पोचली. त्यासाठी रस्ता आणि वळणे रुंद आणि मजबूत करण्यात आली. तरीही या पावसाळ्यात दरडी रस्त्यात कोसळल्या. त्यामुळे वस्तीची गाडी बंद झाली.

दरडी कोसळल्याचे कळताच भेकुर्लीतून महादेव झेन्डे, सखाराम देसाई, नीलेश देसाई, रामा देसाई, साईनाथ देसाई, प्रशांत देसाई, लक्ष्मण नाईक, राजेंद्र नाईक आणि अन्य गावकरी आले. रात्र असूनही त्यांनी रस्ता मोकळा केला; मात्र रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचा अहवाल चालक वाहकांनी दिल्याने विभाग नियंत्रकांनी एसटी वाहतूक बंद केली. ती पूर्ववत सुरु करावी, यासाठी आज भेकुर्लीवासीयांनी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन एसटी सुरु करण्याची मागणी केली. रस्त्याच्या सततच्या दुखण्यामुळे पुन्हा एकदा भेकुर्लीवासीयांना एसटीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Sindhudurg News No ST to Ker Bhekurli