भामट्याने पळवली ओला कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

मालवण - मुंबई ते देवबाग अशी ओला कंपनीकडून आलिशान मोटार भाडेतत्त्वावर घेऊन देवबाग येथे एकजण पर्यटनासाठी आला. मात्र, मोटार घेऊन तो पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

मालवण - मुंबई ते देवबाग अशी ओला कंपनीकडून आलिशान मोटार भाडेतत्त्वावर घेऊन देवबाग येथे एकजण पर्यटनासाठी आला. मात्र, मोटार घेऊन तो पसार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

भामट्याने दोन-तीन दिवस मौजमजा करताना वास्तव्यास असलेल्या हॉटेल मालकालाही दहा ते बारा हजार रुपयांना फसविल्याची माहिती पुढे आली. संबंधित मोटारचालकाने याची माहिती येथील पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली; मात्र भामटा जिल्ह्यातून पसार होण्यात यशस्वी ठरला. 

चार-पाच दिवसांपूर्वी हा भामटा मुंबईतून भाडेतत्त्वावर मोटार घेऊन देवबाग येथे पर्यटनासाठी आला होता. पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर त्याने मोटारचालकाला गाडीत आपली कागदपत्रे राहिली आहे, त्यामुळे किल्ली दे, असे सांगितले. त्या चालकाला हॉटेलवर ठेवत या भामट्याने देवबागमधून मोटारीसह पळ काढला. यात त्याने संबंधित हॉटेलमालकाचे बिल न देता गंडा घातला. संबंधित भामट्याने व्हॉट्‌सॲपवर मॅसेज करून आपण लवकरच येऊ, असे मोटारचालकाला कळविले आहे. 

सलग दुसऱ्यांदा गंडा
संबंधित चालकाकडून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर यापूर्वी फसवणूक केलेल्या व्यक्तीनेच पुन्हा गाडी पळविल्याची माहिती पुढे आली. या संदर्भात पोलिसांनी भामट्याच्या भावाशी संपर्क साधला असता त्याने गाडी मिळवून देण्याचे कबूल केले आहे. सलग दोनदा देवबागातील हॉटेल व्यावसायिकांना फसविणाऱ्या या भामट्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.

Web Title: Sindhudurg News Ola car robbery