भूमी अभिलेख उपअधीक्षकासाठी कणकवलीत लाच घेणारा जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कणकवली - पायवाटेची मोजणी करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख विभागाचा छाननी लिपिक समीर सत्यवान गोलतकर (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयात गुरूवारी दुपारी सांडेतीनच्या सुमारास ही कारवाई केली.

कणकवली - पायवाटेची मोजणी करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख विभागाचा छाननी लिपिक समीर सत्यवान गोलतकर (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख कार्यालयात गुरूवारी दुपारी सांडेतीनच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी सहसंशयित भूमी अभिलेखचे उपअधीक्षक अजित साळुंखे पसार झाल्याचे या विभागाने सांगितले.

जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन महिन्यांतील ही चौथी कारवाई; तर याच आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे. बुधवारी (ता. ३१) वेंगुर्ले येथील मंडल अधिकाऱ्याला विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले होते. त्यानंतर आज कणकवलीत कारवाई केली. दरम्यान, घोणसरी गावातील ही पायवाट ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्याप्रकरणी तत्कालीन घोणसरी ग्रामसेवकावरही २६ जानेवारी २०१६ ला दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली होती. याच प्रकरणात पुन्हा आज भूमी अभिलेख कर्मचाऱ्याकडून लाच घेण्याचा प्रकार घडला.

जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या 
प्रकरणाची दिलेली माहिती अशी - घोणसरी येथील तक्रारदार श्री. पेडणेकर यांच्या पायवाटेचे मोजणी प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे होते. ही मोजणी लवकर करून देण्यासाठी कार्यालयाचे उपअधीक्षक अजित पांडुरंग साळुंखे (वय ३२) यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार श्री. पेडणेकर यांनी लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार सकाळपासूनच भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांनी सापळा लावला होता. दुपारी ३.३० च्या सुमारास साळुंखे यांनी १० हजारांची रक्‍कम छाननी लिपिक समीर गोलतकर याच्याकडे द्या, असे तक्रारदार पेडणेकर यांना सांगितले आणि ते ओरोस येथील बैठकीसाठी कार्यालयातून निघून गेले.

त्यानंतर ३.३५ वाजता पेडणेकर यांनी १० हजारांची रक्‍कम गोलतकर याच्याकडे जमा केली. त्यानंतर तातडीने कारवाई करीत लाचलुचपत विभागाचे जिल्हा उपअधीक्षक शंकर चिंदरकर, पोलिस निरीक्षक मितीश केणी, पोलिस नाईक नीलेश परब, पोलिस पोतनीस, खंडे, राऊत, जामदार, पेडणेकर, मसुरकर आदींनी लाच रकमेसह गोलतकरला ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच भूमी अभिलेखचे अजित साळुंखे यांचा शोध सुरू केला; मात्र ते पसार झाल्याची माहिती ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

घोणसरी गावातील मुख्य रस्त्यापासून शंभर मीटरवर तक्रारदार पेडणेकर यांचे घर आहे. घराजवळ जाण्यासाठी पायवाट होती; मात्र या पायवाटेची ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद नव्हती. पायवाटेवर झाडे लावून तेथील ग्रामस्थानी अतिक्रमण केल्याची तक्रार पेडणेकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. तेथील ग्रामस्थांच्या मते ही पायवाटच नव्हती. त्यामुळे ग्रामस्थ आणि पेडणेकर यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने त्या भागात पूर्वीपासून पायवाट असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार कणकवलीचे तत्कालीन तहसीलदार समीर घारे यांनी घोणसरी ग्रामपंचायतीला तशी नोंद घालण्याचा आदेश दिला होता. तत्कालीन ग्रामसेवक सावंत याने त्या पायवाटेची नोंद घालण्यासाठी पेडणेकर यांच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. ग्रामसेवक सावंत याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ जानेवारी २०१६ रोजी १० हजारांची लाच घेताना पकडले होते.

ग्रामसेवकावर लाच घेतल्याची कारवाई झाल्यानंतर घोणसरी ग्रामसभेने पायवाट नोंदणी रद्द केली होती. त्याविरोधात पेडणेकर यांनी प्रांत आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्या पायवाटेची नोंद करून घ्यावी, असे निर्देश ग्रामपंचायतीला दिले. त्यानंतर ग्रामपंचायतीने पायवाटेची मोजणी करून द्यावी, असे पत्र भूमी अभिलेख आणि तक्रारदार पेडणेकर यांना दिले. याच पायवाटेची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक साळुंखे यांनी १० हजार रकमेची मागणी केली होती.

Web Title: Sindhudurg News one arrested in Kankavali by anti corruption