दोन दुचाकींच्या धडकेत रत्नागिरीतील युवक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

देवगड - थांबलेल्या एसटीला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रत्नागिरीतील युवक जागीच ठार झाला. नीतेश रामचंद्र वणगे (वय २५, पुरये ता. संगमेश्‍वर) असे त्याचे नाव आहे.

देवगड - थांबलेल्या एसटीला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रत्नागिरीतील युवक जागीच ठार झाला. नीतेश रामचंद्र वणगे (वय २५, पुरये ता. संगमेश्‍वर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मागे बसलेला अमित रमेश वणगे (वय १९) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले.

दुसऱ्या मोटारसायकलवरील दोघेही पुणे येथील राहणारे असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. हा अपघात कासार्डे विजयदुर्ग रस्त्यावर पडेल पत्रादुकान थांब्याजवळ आज सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद विजयदुर्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोटारसायकल अपघातातील पुरये (ता. संगमेश्‍वर) येथील युवक नीतेश वणगे आणि अमित वणगे कासार्डे विजयदुर्ग रस्त्यावरून विजयदुर्गकडे जात होते. तर पुणे येथील पर्यटनासाठी कोकणात आलेले तरुण संदीप चंद्रकांत पवार (वय२९) व गुरूदत्त नवगणे (वय२५) हे दोघेजण विजयदुर्गहून पडेलच्या दिशेने येत होते. सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या पडेल पत्रादुकान थांब्याजवळ थांबलेल्या एसटीला मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटारसायकलस्वाराची समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक बसली. ही धडक इतकी मोठी होती की मोटारसायकलस्वार नीतेश वणगे हा जागीच गतप्राण झाला. तर त्याच्या मागे बसलेला अमित वणगे हा गंभीर जखमी झाला. तर समोरील मोटारसायकलवरील पुणे येथील राहणारे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात घडताच एसटी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. माहिती मिळताच विजयदुर्ग पोलिसही तेथे पोचले.

जखमींना उपचारासाठी सुरवातीला पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील जखमी अमित वणगे याला उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले तर पुणे येथील जखमी संदीप पवार व गुरूदत्त नवगणे यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलिस नाईक सुरेश तांबे, संदीप कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे येथील तरुण काही मोटारसायकलने कोकण दर्शनासाठी आले होते. मालवण येथील पर्यटनस्थळांना भेटी देऊन विजयदुर्गहून ते रत्नागिरीला जाणार होते. विजयदुर्ग किल्ला पाहून परतत असताना यातील एक मोटारसायकल अपघातग्रस्त होऊन त्यावरील दोघेजण जखमी झाले. अधिक तपास विजयदुर्ग पोलिस करीत आहेत.

Web Title: Sindhudurg News one dead in an accident