पेटलेल्या घरात होरपळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मालवण - काडीपेटीच्या काडीमुळे ठिणगी उडून आग भडकून घर भस्मसात झाले. आगीमध्ये होरपळून एकाचा मृत्यू झाला. उमेश ऊर्फ बाळा पांडुरंग माळगावकर (वय ५५), असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना येथील मेढा-जोशीवाडा भागात काल (ता.१३) रात्री घडली.

मालवण - काडीपेटीच्या काडीमुळे ठिणगी उडून आग भडकून घर भस्मसात झाले. आगीमध्ये होरपळून एकाचा मृत्यू झाला. उमेश ऊर्फ बाळा पांडुरंग माळगावकर (वय ५५), असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना येथील मेढा-जोशीवाडा भागात काल (ता.१३) रात्री घडली.

याबाबतची माहिती अशी - उमेश ऊर्फ बाळा माळगावकर हे मेढा-जोशीवाडा येथील आपल्या घरात एकटेच वास्तव्यास होते. त्यांच्या घराचे अर्धवट स्थितीत चिरेबंदी बांधकाम झालेले असून घराला पत्रे आणि माडाच्या झावळानी शाकारले होते. मासेमारी व्यवसायात मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असत. काल रात्री साडेअकराच्या दरम्यान ते घरी परतले. घराचे कुलूप उघडण्यासाठी ते गेले असता त्यांच्या हातातील चावी खाली पडली. अंधार असल्याने त्यांनी आपल्याकडील काडीपेटीमधील काड्या पेटवून पडलेली चावी शोधण्याचा प्रयत्न केला. काड्या पेटविल्यानंतर त्यांनी त्या इतरत्र फेकून दिल्या. चावी सापडत नसल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या रमेश कोळंबकर यांच्या मदतीने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. 

काही वेळाने ते झोपी गेले. रात्री बाराच्या सुमारास घराला अचानक आग लागली. शेजारी राहणाऱ्या लीलाधर आचरेकर यांना माळगावकर यांच्या घराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ आपला पाण्याचा पंप सुरू करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करत अन्य स्थानिक नागरिकांना याची माहिती दिली.

पालिकेचा अग्निशमन बंब कुणकेश्‍वर यात्रेच्या ठिकाणी पाठविला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपल्या तीन पंपांच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र घर झावळानी शाकारलेले असल्याने तसेच घराच्या पुढील बाजूस मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडे असल्याने आग अधिकच भडकली. नागरिकांनी घरात असलेल्या बाळा माळगावकर यांना हाका मारत घराबाहेर येण्यास सांगितले. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

माळगावकर ज्या पलंगावर झोपले होते त्या पलंगावरील चादरींनी पेट घेतल्याने माळगावकर आगीत गंभीररीत्या भाजले. लीलाधर आचरेकर, रोहित खडपकर, संतोष तांडेल, संदीप तांडेल, दिलीप आचरेकर, विशाल आचरेकर, बाबा आचरेकर, रोहित जोशी, रमेश कोळंबकर आदी व इतरांनी अथक प्रयत्न करत अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण आणले. या वेळी नागरिकांनी मोठ्याने आरडाओरडा करूनही भाजलेल्या अवस्थेतील माळगावकर यांना शुद्ध नसल्याने त्यांचे बाहेर येणे मुश्‍कील बनले. अखेर रोहित खडपकर याने जीव धोक्‍यात घालत घराच्या बाजूकडील मोकळ्या भागातून घरात प्रवेश करत लीलाधर आचरेकर यांच्या मदतीने भाजलेल्या अवस्थेतील बाळा माळगावकर यांना घराबाहेर आणले. यात रोहित याच्या हाताला दुखापतही झाली.

सुमारे ८० टक्के भाजलेल्या माळगावकर यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र गंभीररित्या भाजलेल्या बाळा माळगावकर यांचा आज सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाला. आज सकाळी तलाठी श्री. तेली यांनी जळालेल्या घराची पाहणी करत पंचनामा केला. आगीमुळे घरातील लाकडे, कपडे, झावळे व इतर साहित्य जळून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. बाळा माळगावकर यांच्यामागे दोन विवाहित बहिणी आहेत.

Web Title: Sindhudurg News one dead in burning house