बंदीकाळातील मासेमारीबद्दल मालवण येथे एकाला दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारीस केलेल्या कीर्तीदा लीलाधर तारी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मालवण - येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारीस केलेल्या कीर्तीदा लीलाधर तारी यांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात जमा करण्याचे आदेशही संबंधिताला देण्यात आले आहेत, अशी माहिती सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आर. आर. महाडिक यांनी दिली.

येथील किल्ल्यानजीकच्या समुद्रात दोन दिवसापूर्वी एक मासेमारी नौका पलटी झाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. महाडिक यांनी परवाना अधिकारी सतीश खाडे यांना याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या चौकशीत कीर्तीदा लीलाधर तारी यांची ही नौका असल्याचे तसेच कीर्तीदा तारी, लीलाधर तारी, बस्त्याव डिसोझा, सचिन केळसकर हे चारजण त्या नौकेवर असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार परवाना अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पावसाळी कालावधीत बंद असलेल्या मासेमारी नियमांचा भंग, मासेमारीचा परवाना नसल्याप्रकरणी तसेच नौकेवर नाव व नोंदणीक्रमांक नसल्याप्रकरणी तारी याला नोटीस बजावली. या प्रकरणाची सुनावणी काल न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाली. यावेळी तारी याला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड मत्स्य व्यवसाय कार्यालयात जमा करण्याचे आदेश तारी याला देण्यात आले असल्याचे श्री. महाडिक यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg News one fined in illegal fishing