वेंगुर्ले तालुक्यात भातशेतीचे रूपडे पालटले

दीपेश परब
मंगळवार, 26 जून 2018

वेंगुर्ले - तालुक्‍यातील भात शेतीचे रूप यंदा पालटले आहे. यांत्रिकीकरणाच्या मदतीने श्री पद्धतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा या पध्दतीला मिळणारा प्रतिसाद पाहता तब्बल ८० ते ९० एकरवर आधुनिक भातशेती फुलेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

वेंगुर्ले - तालुक्‍यातील भात शेतीचे रूप यंदा पालटले आहे. यांत्रिकीकरणाच्या मदतीने श्री पद्धतीने लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा या पध्दतीला मिळणारा प्रतिसाद पाहता तब्बल ८० ते ९० एकरवर आधुनिक भातशेती फुलेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

सरकारच्या २७ एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार शेती विकासाच्या विविध योजना जिल्हयात राबवल्या जात आहेत. यातीलच चांदा ते बांदा या राज्य शासनाच्या योजनेंर्तगत समृद्ध शेती, उन्नत शेती या योजनेतून यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने शेतीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

ठिकठिकाणी कृषी सहाय्यकांच्या व केरळ येथील तज्ञांच्या टीमच्या मदतीने रोपवाटिका तयार केल्या आहेत. आधुनिक शेतीसाठी जेवढा खर्च व मनुष्यबळ लागते त्यापेक्षा कमी खर्चात व कमी मनुष्यबळात ही शेती यशस्वी ठरू शकते, हे शेतकऱ्यांना पटवून दिल्यानंतर शेतकऱ्यांचा कल या शेतीकडे वाढत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत ६ एकरवरील शेतीसाठी रोपवाटिका तयार झाल्या असून, अजूनही रोपवाटिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

होडावडा येथे तयार केलेल्या या रोपवाटीकांची यांत्रिकीकरणाद्वारे नुकतीच यशस्वी लागवड येथील शेतकरी राजबा सावंत यांच्या शेतात झाली. नवशक्ति शेतकरी कला क्रिडा मंडळ, तुळस पंचक्रोशी यांच्या मार्फत कृषी विभाग वेंगुर्ले व फुड सिक्‍युरिटि आर्मी केरळ यांच्या टिमने यंत्राच्या सहाय्याने भात लागवडीचे यशस्वी प्रत्यक्षिक सादर केले. यावेळी सभापती यशवंत परब, जिल्हा बॅंक संचालक प्रकाश परब, कृषी अधिकारी घोंगे, शेतकरी दिलीप परब, प्रगतशील शेतकरी राजबा सावंत, निलेश भगत, सीताराम राणे, सचिन दाभोलकर, कृषी सहाय्ययक गोळम, राऊळ, खडपकर उपस्थित होते. 

‘‘या यांत्रिक पद्धतीने शेतीचा लाभ घेऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नत्ती साधावी. त्यासाठी कृषी विभागाचे सहकार्य घ्यावे.’’
- यशवंत परब,
सभापती वेंगुर्ले

पारंपरिक शेती करताना पेरणीपासून ते लावणीपर्यंत एकरी ६ ते ८ मजूर लागतात तर सुमारे ९ हजार रुपये खर्च येतो व उत्पन्नही कमी मिळते. याउलट या यांत्रिकीकरणाद्वारे श्री पद्धतीने शेतीत रोपवाटिका पेरण्यास १ दिवस व ३ ते ४ माणसे तर यानंतर रोपवाटिका रुजून आल्यानंतर मशीनद्वारे पेरणीने एकरी १ दिवस व ३ ते ४ माणसे लागतात तर सुमारे ४ हजार ५०० रुपये खर्च येतो व दुप्पट उत्पन्न मिळते. म्हणजेच ही शेती फायदेशीर आहे.
- राजबा सावंत,
प्रगतिशील शेतकरी

Web Title: Sindhudurg News paddy cultivation Modern method in Vengurle