सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक संघटनेचे आंदोलन स्थगित, पर्यटकांची मोठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

मालवण - सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात ९ जानेवारीला मंत्रालयात संबंधित विभागाच्या मंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यानंतर संघटनेने आंदोलन तूर्त स्थगित केले.

मालवण - सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात ९ जानेवारीला मंत्रालयात संबंधित विभागाच्या मंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्यानंतर संघटनेने आंदोलन तूर्त स्थगित केले. मात्र, येत्या महिनाभरात मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिला. दरम्यान येथे किल्ला पाहण्यासाठी आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करून महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आजपासून १ जानेवारीपर्यंत किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने काल पत्रकार परिषद घेत जाहीर केला होता. ऐन पर्यटन हंगामात पर्यटकांना किल्ले दर्शनापासून वंचित राहण्याची वेळ या आंदोलनामुळे निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. 

यासंदर्भात आज पालकमंत्री केसरकर यांनी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात येत्या ९ जानेवारीला मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. यात प्रलंबित समस्या सोडविण्यात येतील असे आश्‍वासन दिले. याचबरोबर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत येत्या आठवड्यात संघटनेच्या विविध समस्यासंदर्भात बैठक घेऊन त्याचा अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत सादर केला जाईल असे स्पष्ट केले. त्यानुसार प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनीही प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत समस्यासंदर्भात संबंधित विभागाच्या मंत्र्याचे लक्ष वेधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. 

किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन तूर्त स्थगित केल्यानंतर साडे दहा वाजता किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे किल्ले दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना किल्ले दर्शनाचा लाभ मिळाला; मात्र दुपारी ओहोटीमुळे प्रवासी होडी वाहतूक सेवा चार वाजल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे पर्यटकांना ताटकळत राहावे लागले होते. पालकमंत्री केसरकर यांनी होडी वाहतूक संघटनेच्या मागण्यासंदर्भात ९ जानेवारीला बैठक घेतली जाणार असल्याचे आश्‍वासन दिल्याने आजपासून छेडण्यात आलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. मात्र, येत्या महिनाभरात या मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ फेब्रुवारीपासून बेमुदत बंदचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला.

Web Title: Sindhudurg News Passenger boat transport organisation agitation Postponed