पाट शिवसेना शाखाप्रमुख यशवंत परब अपघातात ठार

पाट शिवसेना शाखाप्रमुख यशवंत परब अपघातात ठार

कुडाळ - कुडाळ-पाट रस्त्यावरील एमआयडीसी येथे दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिवसेना पाट शाखाप्रमुख दुचाकीस्वार यशवंत आनंद परब (वय ३८) हे जागीच ठार झाले.

याबाबत माहिती अशी तालुक्‍यातील पाट परबवाडा येथील यशवंत परब हे कुडाळ येथे कामानिमित्त आपल्या दुचाकीने येत होते. सकाळी घरातून कुडाळच्या दिशेने येत असताना पिंगुळी कौल कारखानानजीक दोन्ही वाहनात भीषण अपघात झाला. डंपर हा पाटच्या दिशेने जात होता. परब हे रस्त्यावर पडून जागीच ठार झाले. त्यांच्या डोक्‍यात हेल्मेट होते; मात्र तरीही त्यांच्या मानेची एक बाजू कापली गेली. धडक दिलेल्या डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला. पिंगुळी पाट येथील ग्रामस्थांनी श्री. परब यांना ग्रामीण रुग्णालयात हलवले. यशवंत परब यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. चार वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अलीकडेच त्यांनी सोलर एजन्सी सुरू केली होती. तसेच कुडाळातील सुवर्णकार मठकर यांच्याकडे ते कारागीर म्हणून कामाला होते.

अतिशय शांत स्वभाव, सर्वांसोबत मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्त्व होते. या अपघाताने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच शिवसेना शाखाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. ग्रामीण रुग्णालयात सभापती राजन जाधव, संजय पडते, वर्षा कुडाळकर, अतुल बंगे, श्रेया परब, शिल्पा घुर्ये, रोटरीचे डी. के. परब, मनोज मठकर, सौ. मठकर, महेश वेळेकर, संजय वेंगुर्लेकर तसेच शिवसेना सर्वपक्षीय ग्रामस्थांनी धाव घेतली. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

दोडामार्ग-साळ येथे पणतुर्लीतील युवक ठार

दोडामार्ग - पणतुर्ली येथील राघोबा विलास गवस (वय १७) या दोडामार्ग येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दोडामार्ग सीमेवरील साळ खोलपेवाडी येथील अपघातात मृत्यू झाला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रावर बांबोळी गोवा येथे उपचार सुरू आहेत. 
खोलपेवाडी येथील राजा शिवाजी विद्यालयाजवळच्या एका धोकादायक वळणावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या दुधाच्या टॅंकरचे चाक त्याच्या दुचाकीच्या मागच्या चाकावरून गेले.

अपघातात राघोबा याच्या दोन्ही पायाला मोठा मार लागला होता. त्याला १०८ रुग्णवाहिकेत घालताना तो व्यवस्थितपणे बोलत असल्याचे त्याला मदत करणाऱ्यांनी सांगितले. म्हापसा गोवा येथील जिल्हा रुग्णालयातून बांबोळी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. राघोबा आणि त्याचा मित्र साळ गोवा येथून दोडामार्गकडे येत असताना दुपारी दीडच्या दरम्यान अपघात झाला.

अपघात झाल्याची माहिती कळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, भगवान गवस, विजय जाधव, परमे सरपंच आनंद नाईक आदींनी तत्काळ धाव घेतली. श्री. जाधव यांनी चौकशी केली असता त्याने आपले नाव व पत्ता सांगीतला. त्याआधी कुणीतरी फोन केल्याने १०८ रुग्णवाहिका आली. त्यातून त्या दोघांना म्हापसा येथे नेण्यात आले.

राघोबा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. बहीण मोठी. आई वडील मोलमजुरी करतात. त्यांच्यावर असा प्रसंग ओढवल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बुधवारी होता वाढदिवस
राघोबाचा वाढदिवस बुधवारी (ता. २४) होता; पण त्याआधीच त्याचे अपघाती निधन झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

दुचाकी-बस धडकेत बांद्यात एकाचा मृत्यू

बांदा - मुंबई-गोवा महामार्गावर येथील कट्टा कॉर्नर येथे खासगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात नागराज दुर्गाप्पा गडेकर (वय ३१, रा. बैलहोंगल-बेळगाव, सध्या रा. चांदेल, गोवा) याचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली.

याबाबत माहिती अशी नागराज गडेकर हा कामानिमित्त चांदेल येथील क्रशरवर होता. अन्य क्रशर किंवा तत्सम कामांसाठी कामगार पुरविण्याचे काम करायचा. तो विलवडे येथे आपल्या कामगारांना पगार देण्यासाठी गेला होता. आज सोमवार आठवडा बाजारादिवशी त्याला सुट्टी होती. विलवडेहून बाजारासाठी दुचाकीने (जीए ०३ एफ ९५६८) निमजगा येथून कट्टा कॉर्नर सर्कलवरून तो बाजारपेठेत येण्यासाठी महामार्गावरून वळत असताना मुंबईहून गोव्याकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या लक्‍झरी बसने  (जीजे ०३ बीव्ही ४१०३) दुचाकीला ठोकरले.

या अपघातात नागराज महामार्गावर फेकला जाऊन जोरदार आदळला. त्याच्या डोक्‍यासह छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिकांनी धाव घेतली. नागराजला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून गोवा बांबुळी येथे जाण्याचा सल्ला दिला; मात्र काही वेळातच नागराजचा मृत्यू झाला.

येथील सहायक पोलिस निरीक्षक नागेश गावकर, सुधीर कदम, प्रीतम कदम, दत्ता देसाई यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रवासी बस चालक संदीप पंडित सेजूर याला ताब्यात घेतले. येथील पोलिसात उशिरापर्यंत चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच बेळगावमधील शेकडो कामगार येथील प्राथमिक केंद्रात दाखल झाले होते.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
नागराज गडेकर याच्यावर पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी होती. मोठ्या भावाच्या मुलांसह सुमारे १५ जण त्याच्यावर अवलंबून होते. अन्य कामगारांच्या तुलनेत तो बराच कष्टाळू होता. त्याच्या अपघाती जाण्याने गडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन लहान मुले, पुतणे, पुतणी, भाचे असा मोठा परिवार आहे.

डॉक्‍टर नसल्याने रुग्णवाहिका कुचकामी
गडेकर याला गंभीर दुखापत असल्याने येथील डॉक्‍टरांनी गोवा बांबुळी येथे जाण्याचा सल्ला दिला. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध होती; मात्र रुग्णवाहिकेवरील डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका कुचकामी ठरली. त्यानंतर अर्ध्या तासांनी गडेकर यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com