खड्डेमुक्तीचे स्वप्न भंगलेच

एकनाथ पवार
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

३१ मे २०१६ नंतर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, अशी अनोखी घोषणाही जाहीर केली होती; परंतु बांधकाममंत्र्याचे खड्डेमुक्तीचे स्वप्न अक्षरक्ष भंगले आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे,  अशी स्थिती आज सर्वदूर पाहायला मिळत आहे.

वैभववाडी - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याला खड्डेमुक्त करण्याचा संकल्प आणि स्वप्न पाहिले होते. त्याकरिता ३१ मे २०१६ नंतर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, अशी अनोखी घोषणाही जाहीर केली होती; परंतु बांधकाममंत्र्याचे खड्डेमुक्तीचे स्वप्न अक्षरक्ष भंगले आहे. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे,  अशी स्थिती आज सर्वदूर पाहायला मिळत आहे.

२०१६ मध्ये मंत्री श्री. पाटील यांनी वैभववाडीतील एका रस्ता कामांच्या प्रारंभप्रसंगी राज्य खड्डेमुक्तीचा संकल्प जाहीर केला. राज्यातील रस्ते दर्जेदार बनविण्यात येतील. दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. एवढेच नव्हे तर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर रस्ता देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असेल. याचवेळी त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. कामांचा दर्जा टिकविण्यासाठी रस्ता कामांची रक्कम ठेकेदाराला एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने दहा वर्षात दिली जाईल, असेही स्पष्ट केले होते.

सरतेशेवटी खड्डेमुक्त महाराष्ट्र बनिवण्याकरीता त्यांनी ३१ मे २०१६ नंतर खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, अशी घोषणा केली होती.
मंत्री श्री. पाटील यांनी राज्य खड्डेमुक्तीसाठी केलेली ही घोषणा राज्यभर चांगलीच गाजली. जुन २०१६ मध्येच अनेक रस्त्यांना खड्डे पडल्याचे चित्र होते. सिंधुदुर्गात तर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असे विदारक स्थिती होती; परंतु एखाद्या घोषणेनंतर सर्व रस्ते एकदम खड्डेमुक्त होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे; परंतु मंत्र्यानी घोषणा केल्यानंतर आता तब्बल पावणेदोन वर्षाचा कालावधी लोटला आहे.

सध्याची रस्त्यांची अवस्था बिकट आहे. कोणत्याही रस्त्याने प्रवास केला तरी थोड्याफार प्रमाणात सर्वत्र सारखीच स्थिती आहे. काही रस्त्यांवरून वाहतुक करणे वाहनचालकांनी बंद केली असुन रस्त्यालगत असलेल्या साईडपट्टीवरून वाहतुक करण्याला चालक पसंती देताना दिसत आहेत. राष्ट्रीय, राज्य किंवा अन्य कोणताही मार्ग असु देत खड्डा नाही असा रस्ता नाही, अशी आजची अवस्था आहे.

मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. या पावणेदोन वर्षातील पावसाळी कालावधी वगळता तरी खड्डे बुजविणे किंवा रस्त्यांच्या नुतनीकरणाकरीता भरपुर वेळ बांधकाम विभागाकडे होता; मात्र खड्डे बुजविण्याच्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचललले नाही. यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली. जिकडे जावे तिकडे खड्डे अशीच स्थिती आहे. यामुळे मंत्री पाटील यांनी नेमकी खड्डेमुक्त की खड्डेयुक्त रस्त्यांची घोषणा केली अशी चर्चा आता वाहनचालकांमध्ये रंगु लागली आहे.

२०१६ पुर्वी रस्त्यांना पडलेले खड्डे गणेशोत्सव किंवा पावसाळा संपल्यानंतर भरले जात होते; परंतु खड्डेमुक्तीची घोषणा केल्यानंतर खड्डे बुजविण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. सध्या जिल्हयातील आणि राज्यातील कोणत्याही रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य आहे.त्यामुळे मंत्री श्री. पाटील यांचे खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न भंगले आहे. या घोषणेची अमंलबजावणी का झाली नाही याचे आत्मपरीक्षण खुद्द मंत्री आणि त्यांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी करणे आवश्‍यक आहे.

वैभववाडीत येताना घोषणेची आठवण
बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तळेरे-कोल्हापूर मार्गाने कोल्हापूर गाठले. याच मार्गाच्या काही किलोमीटरच्या प्रारंभाप्रसंगी त्यांनी खड्डेमुक्त राज्याची घोषणा केली होती; परंतु तळेरेहून वैभववाडीपर्यंत येईपर्यंत त्यांना आपल्या घोषणेची चांगलीच आठवण झाली असेल, एवढे मात्र नक्की.

कोटी कोटीची उड्डाणे थांबवा
सध्या राज्यातील अनेक मंत्री हजार आणि लाख  कोटीच्या प्रकल्पाच्या घोषणा करीत आहेत. त्यांचेच पदाधिकारी त्याच घोषणाची पुन्हा पुन्हा घोषणा आपआपल्या पद्धतीने जिल्ह्यात करताना दिसत आहेत; परंतु अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्ती किंवा नूतनीकरणाकरिता निधी का दिला जात नाही, याचे उत्तर त्यांच्याकडे आहे का? त्यामुळे कोटी कोटीची उड्डाणे करण्यापेक्षा अगोदर दळणवळणाची प्राथमिक सुविधा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या रस्त्यांतील खड्डे बुजवा आणि नंतरच घोषणा करा, अशी टीका सर्व स्तरातून होत आहे.

 

Web Title: Sindhudurg News potholes on road