शेतकऱ्यांचे दूध ‘महानंद’ घेणार - जठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कणकवली - सिंधुदुर्गातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडील दूध आता महानंद या शासकीय डेअरीकडून घेतले जाणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबतची माहिती दिली. गोकुळ संघाने दूध संकलन थांबविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले होते.

कणकवली - सिंधुदुर्गातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडील दूध आता महानंद या शासकीय डेअरीकडून घेतले जाणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबतची माहिती दिली. गोकुळ संघाने दूध संकलन थांबविल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले होते.

सिंधुदुर्गातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सिंधुदुर्गातील दूध संकलनाबाबतची माहिती दिली. गोकुळ संघाने दूध संकलन थांबविल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शासकीय डेअरीकडून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे दूध संकलन केले जावे, अशी मागणी जठार, गावडे यांनी केली.

दरम्यान, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला महानंद दूध डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनश्‍याम मंगळे, सहसंचालक श्री.वाघ, दुग्धविकास अधिकारी विकास आवटी आदी उपस्थित होते. या बैठकीत जानकर यांनी शेतकऱ्यांकडील दूध महानंद डेअरीकडून संकलन केले जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा दूध महासंघाचे पुनर्जिवन केले जाणार आहे. त्यासाठी दूध संघाला उचल म्हणून २५ लाख रूपये दिले जातील, याखेरीज दूध व्यवसायाला चालना मिळावी यासाठीही विविध उपाययोजना राबविल्या जातील अशी ग्वाही जानकर यांनी दिल्याची माहिती जठार यांनी दिली.

Web Title: Sindhudurg News Pramoad Jathar comment