भाजपचा नगराध्यक्ष बसविण्याची जबाबदारी राणेंची - प्रमोद जठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांच्या संकटकाळात भाजपने हात दिलाय. खासदार होण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धर्म पाळावा आणि कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष बसवावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे केले. 

कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना त्यांच्या संकटकाळात भाजपने हात दिलाय. खासदार होण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा धर्म पाळावा आणि कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष बसवावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे केले. 

येथील भाजप कार्यालयात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत, चंद्रहास सावंत आदी उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले, ""नगरपंचायत निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष होणार आहे; मात्र यात स्वाभिमान पक्षाने अडथळे आणू नयेत. या पक्षाची स्थापना करणाऱ्या श्री. राणे यांना भाजपने संकटसमयी हात दिला आहे. त्यांना खासदारकीची संधी उपलब्ध करून दिली. आता कणकवली नगरपंचायतीवर भाजप नगराध्यक्ष बसविण्याची जबाबदारी त्यांची आहे. आमच्या नगराध्यक्ष उमेदवारात त्यांनी अडथळे आणू नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे. भाजपला साथ देणे हे राणेचे नैतिक कर्तव्यच आहे.'' 

ते म्हणाले, ""कणकवली नगरपंचायतीसाठी आम्ही जनतेच्या मनातील उमेदवार नगराध्यक्षपदासाठी दिला आहे. त्यामुळे संदेश पारकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी संपूर्ण कणकवलीकरांची आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचप्रमाणे कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष आला, तरच खऱ्या अर्थाने कणकवलीचा विकास होणार आहे. इथल्या जनतेने पारकर यांना नगराध्यक्ष करावे, शहराच्या संपूर्ण विकासाची हमी आम्ही देत आहोत.'' 

धुमाळे, आरोलकर यांची नाराजी दूर 
नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग 5 मधून राजश्री धुमाळे आणि प्रभाग 12 मधून वैशाली आरोलकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. त्यांची नाराजी आम्ही दूर केली आहे. उद्या (ता.26) ते आपला अर्ज मागे घेतील असे श्री. जठार म्हणाले. भाजपच्या गीतांजली कामत या देखील प्रचंड नाराज होत्या. त्यांचाही समजूत आम्ही काढली आहे. तर प्रभाग 16 मधील अपक्ष उमेदवार उमेश वाळके यांनीही आपला अर्ज मागे घेऊन भाजपला पाठिंबा द्यावा. त्यांच्या सुप्त इच्छा भाजपमध्ये आल्यानंतरच पूर्ण होतील असेही श्री. जठार म्हणाले. 

राजन तेली प्रचारात सक्रीय होणार 
संदेश पारकर यांच्या निवासस्थानी सुरू झालेल्या भाजप प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन प्रदेश चिटणीस राजन तेली यांनीच केले होते. तसेच भाजपच्या उमेदवारांचीही निश्‍चिती श्री. तेली यांच्याच उपस्थितीत झाली. त्यामुळे ते नगरपंचायत निवडणुकीपासून अलिप्त नाहीत. अर्ज माघारीनंतरच्या प्रचार रणधुमाळीत श्री. तेली सहभागी होतील अशी माहिती श्री. जठार यांनी दिली. 

भाजपमध्ये घराणेशाही नाही 
भाजपने एका घरात एकालाच तिकीट दिले आहे; पण काही पक्षांनी पत्नी-पत्नींना तिकीट देऊन घराणेशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. काहींना उमेदवारच न मिळाल्याने इतर प्रभागातून आयात करावे लागले आहेत. या उलट भाजपने सर्व प्रभागात स्थानिक उमेदवारांनाच संधी दिली असल्याचे श्री. जठार म्हणाले. 

Web Title: Sindhudurg News Pramod Jathar comment