राणेंचे मंत्रिपद सध्यातरी हवेत - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

वैभववाडी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ‘एनडीए’तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. त्या जमिनीवर आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरवर चर्चा करू, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे टाकली.

वैभववाडी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ‘एनडीए’तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. त्या जमिनीवर आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरवर चर्चा करू, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे टाकली.

भाजपचा एक सदस्य असताना नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले होते. आता भाजपचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी मैत्री केली तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेची पदे मिळू शकतील, अशी खुली ऑफर आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत काल (ता. ४) दिली. नीतेश राणेंची ऑफर भाजप स्वीकारणार का? असे पत्रकारांनी प्रमोद जठार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले,

‘‘स्वाभिमान पक्षाचे `एनडीए’तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद ही हवेतील चर्चा आहे. ती जमिनीवर येऊ दे. त्यानंतरच त्यांच्या ऑफरवर चर्चा करू. आताच त्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही.’’

\पालकमंत्री दीपक केसरकर मला सत्तेत एकत्र असल्याची जाणीव करून देत आहेत; परंतु जिल्ह्यातील विकासाचे व्यवस्थापन करण्यात पालकमंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग करून जनतेचे जीवन सुसह्य बनविणे ही घटक पक्ष म्हणून भाजपबरोबरच शिवसेनेचीही जबाबदारी आहे; परंतु यश आले तर त्याचे श्रेय शिवसेनेने घ्यायचे आणि अपयश आले तर ते भाजपच्या माथी मारायचे. ही दुटप्पी भूमिका शिवसेनेने सोडून द्यावी, असा सल्ला जठार यांनी दिला.

‘तुमच्यावर भरोसा नाय का ?’
प्रमोद जठार मित्रपक्षातील आहेतच. त्याचबरोबर ते आपलेही मित्र आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर टीका करू नये, असे विधान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यावर जठार म्हणाले, ‘‘सत्तेत असूनही खड्ड्यांच्या मुद्यावर शिवसेना  रस्त्यावर आंदोलन करते. त्यामुळे मला दिलेला सल्ला केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि अरुण दुधवडकर यांना द्यावा. त्यांचा तुमच्यावर भरोसा नाय का? असा मिश्‍किल प्रश्‍न या वेळी केसरकरांना उद्देशून जठार यांनी केला.

Web Title: Sindhudurg News Pramod Jathar comment