विजयदुर्गात जमीन व्यवहारात काळा पैसा - प्रमोद जठार

विजयदुर्गात जमीन व्यवहारात काळा पैसा - प्रमोद जठार

सावंतवाडी - विजयदुर्ग येथे मुंबईस्थित एका व्यापाऱ्याने सहाशे एकर जमीन खरेदी केली आहे; मात्र खरेदीदार म्हणून स्थानिक शेतकरी दाखविले गेले. यासाठी काळ्या पैशाचा वापर केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून बजावलेल्या नोटिसीतून हा प्रकार उघड झाला आहे. यात पंचवीसहून अधिक सहभागी आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  येथे पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाची आता जिल्ह्यातील अन्य करोडपतींवर नजर आहे आणि विशेष म्हणजे राजकारणात असले, तरी या चौकशीतून कोणी सुटणार नाही, असा टोलाही या वेळी त्यांनी लगावला. माजगाव येथील डी. के. टुरिझम सभागृहात आज भाजपच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

या वेळी जिल्हाध्यक्ष जठार यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रदेश सरचिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहर अध्यक्ष आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

या वेळी जठार म्हणाले, ‘‘देशातील चलन दरवर्षी बदलावे हा विचार १९६५ मध्ये महात्मा गांधीजींच्या जवळचे मानले जाणारे आप्पासाहेब पटवर्धन यांनी मांडला होता. पटवर्धन यांचे चलनशुद्धीचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला घेतलेला निर्णय हा देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहावा असा असून तो निर्णय नोटाबंदीचा नाही तर चलनशुद्धीचा होता. या निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला महात्मा गांधींच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना गांधीजींच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आत्मचरित्राची भेट देणार आहे.’’

चलनशुद्धीमुळे देशात पंचवीस टक्के कर भरणाऱ्यांमध्ये वाढ झाली. सुमारे २ लाख बोगस कंपन्या बंद झाल्या. १८ लाख बॅंकांचे व्यवहार तपासण्यात आल्याचे सांगत सिंधुदुर्गातही काळा पैसा गुंतविणाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये विजयदुर्ग येथे मुंबईतील काही व्यावसायिकांनी काळा पैसा गुंतविण्याच्या उद्देशाने सुमारे ६०० एकर जमीन तेथील काही स्थानिकांच्या नावे खरेदी केली.

या स्थानिकांच्या बॅंक खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाले. प्रत्यक्षात त्यांची आर्थिक कुवत महिन्याला चार-पाच हजार कमविण्याचीही नाही. या सर्वांना आयकर विभागाच्या नोटिसा जारी झाल्या आहेत. त्यांना आपल्या उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट करण्याच्या नोटिसा आयकर विभागाने बजावल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा घोटाळा उघडकीस येऊन काळ्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या जमिनी सरकारजमा होतील, असा दावाही जठार यांनी केला.

तिन्ही तालुक्‍यात करण्यात येणाऱ्या विकासकामाची रूपरेषा या मेळाव्यात ठरविण्यात आली. तसेच बूथ ॲपद्वारे प्रत्येक गावनिहाय बूथ अध्यक्ष आणि २५ सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले.

हवेत नाही हवेच
माजी मुख्यमंत्र्यांना भाजपकडून देण्यात येणारे मंत्रिपद हवेतच असल्याचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी सांगितले होते; मात्र खुद्द राणे यांनी काही दिवसांत मंत्रिपदाची शपथ घेण्यार असल्याचे जाहीर केले. याबाबत जिल्हाध्यक्ष जठार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘राणेंना जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत ते हवेतच आहेत.’’ तर बाजूला असलेल्या अतुल काळसेकर यांनी हवेतच नाही, हवेच आहे, असा चिमटा काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com