अत्यवस्थ रुग्णांना बांबुळीत शुल्क नाही - मनोहर पर्रीकर

अत्यवस्थ रुग्णांना बांबुळीत शुल्क नाही - मनोहर पर्रीकर

कुडाळ - गोवा सरकार मेडिकल कॉलेजमध्ये अत्यवस्थ रुग्णांना शुल्काबाबत तोडगा निघेपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणार नाही, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली. गोवा सरकार सिंधुदुर्गातील रुग्णांना आरोग्य व्यवस्थेबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे; मात्र महाराष्ट्र सरकारने रुग्णांच्या सेवेसाठी शुल्काबाबत चर्चा करावी, असेही पर्रीकर म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याशी आज गोवा विधानभवनात सिंधुदुर्गातील आरोग्याच्या प्रश्‍नाबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर श्री. जठार यांनी कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, जयदेव कदम, बंड्या सावंत, सदा अणावकर, श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेबाबत स्वतः मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फोन करून आमच्याशी संवाद साधला. गोवा सरकारचे अधिवेशन सुरु असून आरोग्याबाबत अधिवेशनात चर्चा होणार असल्याने चर्चेसाठी तुम्ही या, असे आम्हाला निमंत्रण दिले. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री पर्रीकर, विश्‍वजित राणे यांची भेट घेऊन चर्चा केली.

या वेळी पर्रीकर यांनी इमर्जन्सी रुग्णांना तोडगा निघेपर्यंत गोवा सरकार कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे सांगितले; मात्र या शुल्काबाबत तुम्ही महाराष्ट्र सरकारशी चर्चा करा किंवा गोवा मेडिकल कॉलेज महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी सारख्या आरोग्य योजनेत अंतर्भूत करावे त्यासाठी प्रयत्न करा अशी सूचना केली.’’

ते म्हणाले, ‘‘मी एक सत्ताधारी भाजप पक्षाचा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आहे. अजूनही आम्ही गोवा सरकारवर आरोग्याच्या प्रश्‍नासाठी अवलंबून आहोत याची खंत वाटते. आमचे मिशन सिंधुदुर्गात एक चांगले अद्ययावत रुग्णालय व्हावे असे आहे. कोकणात ग्रिनरिफायनरीसारखे प्रकल्प झाले असते तर चांगल्याप्रकारे अद्ययावत रुग्णालय देण्यास तयार आहोत असे त्या कंपन्यांनी कबुलही केले; मात्र आपल्याकडे विरोधासाठी विरोध होत आहे. नारायण राणेंचे होत असलेले हॉस्पीटल हे खासगी असल्याने त्यांनी सर्वसामान्यांना मोफत सेवा दिली तर आनंदच आहे.’’

गोवा सरकार खर्च कुठून भरून काढणार....
श्री. जठार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सूचनेवरून आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत भेट घेऊन ठोस तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ. गोवा राज्याचे आरोग्यासाठी ६० कोटी रुपयांचे बजेट आहे. त्या बजेटच्यावर झालेला खर्च गोवा सरकार कुठून भरून काढणार? त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी येणारे शुल्क भरण्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com