निराधार गर्भवती महिलेचे सावंतवाडीतून पलायन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

येथील अंकुर महिला केंद्रातील एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेने केंद्रातून पलायन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे पलायन केलेल्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) - येथील अंकुर महिला केंद्रातील एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेने केंद्रातून पलायन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे पलायन केलेल्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कुटीर रुग्णालयातून बावीस वर्षाच्या महिलेने पलायन केले. या प्रकरणी आज केंद्राच्या काळजीवाहूने रसिका श्रीराम पेडणेकर पोलिसांकडे संबंधित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे. या महिलेने एका युवकासोबत विवाह केला होता. दरम्यान काही दिवसांनी तिचे त्याच्याशी पटले नाही. त्यामुळे तिने माहेर आई-वडिलांकडे धाव गेतली. मात्र धर्माच्या बाहेर विवाह केल्याने तिला स्वीकारण्यास घरातील व्यक्तींनी नकार दिला. त्यामुळे निराश्रित अवस्थेत ती कोल्हापूरमध्ये बेवारसपणे फिरू लागली, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी अंमलदार पोलिस उपनिरिक्षक देवानंद माने यांनी दिली.

बेवारस अवस्थेतील या महिलेबाबत स्थानिक नागरिकांनी कोल्हापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिला कोल्हापूरमधील शासकीय तेजस्विनी महिला केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तेथे बाळंतपणाची सोय नसल्याने तिला सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारी नियमित तपासणीसाठी तिला पेडणेकर यांनी कुटीर रुग्णालयात नेले. त्यावेळी आवश्‍यक ती कागदपत्रे जमा करताना पेडणेकर यांची नजर चुकवून संधीचा फायदा घेत महिलेने पलायन केले. रुग्णालय आणि परिसरात शोध घेऊनही महिला सापडली नाही. त्यामुळे पेडणेकर यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली, अशी माहिती ठाणे अंमलदार गवस यांनी दिली.

निवारा केंद्राची सुरक्षा ऐरणीवर
शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या अंकुर निवारा केंद्रात महिलांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यापूर्वी दीड वर्षांपूर्वी देखील एका महिलेने येथून पलायन केले होते. दरम्यान काही दिवसांनी पुन्हा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: sindhudurg news pregnant women women flee