कोकण पर्यटनाकडे प्राधान्याने लक्ष गरजेचे

नितीन वाळके
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कडू-गोड आठवणी, संमिश्र भावना आणि विविध अनुभवांनी भरलेले २०१७ हे वर्ष आता संपत आले आहे. नवे कोरे २०१८ वर्ष उंबरठ्यावर आपल्या स्वागतासाठी अगदी सज्ज आहे. नव्या वर्षात नव्या आकांक्षा आहेत, नवे संकल्प आहेत, तसेच नवी आव्हानेही आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने नव्या वर्षात विविध क्षेत्रात नेमकी काय आव्हाने आहेत? जिल्ह्याची वाटचाल कशी होईल, याचा वेध...

कोकणच्या किनारपट्टीवरील पर्यटनाची राजधानी म्हणून मालवण, तारकर्ली, देवबाग परिसर सर्वमान्य होऊन जवळपास तपभर उलटून गेले आहे. आज जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेणारा आणि जगाच्या पर्यटन नकाशावर आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडणारा अशा रूपात परिवर्तित झाला आहे. प्रतिवर्षी दहा लाख पर्यटकांच्या व्यापक उपस्थितीची झेप घेत महाराष्ट्राच्या पर्यटनात एक स्वतःचे निराळे स्थान निर्माण केले आहे. आजही शासनाची म्हणावी तशी मदत या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून भरीव ओळख निर्माण करून देण्यात होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आत्ता आता पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणेला जाग येऊन काही प्रयत्न होत आहेत. केरळ, गोवा किंवा गुजरात सरकार ज्या पद्धतीने पर्यटनाकडे एक व्यवसाय म्हणून लक्ष पुरविते आहे, तसे लक्ष महाराष्ट्र शासन कोकणच्या या पर्यटनाकडे देत आहे, असे ठाशीवपणे म्हणता येणार नाही. जिल्ह्याच्या पर्यटनाविषयी घेतलेला मागोवा...

मालवण, तारकर्ली, देवबाग परिसर मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करून घेऊ शकला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ठराविक कालावधीने या परिसरात पर्यटकांना मोहविणारी, रिझविणारी नवनवीन आकर्षणे स्थानिक व्यावसायिकांनी निर्माण केली. आरंभीच्या काळात शिवछत्रपतींचा किल्ले सिंधुदुर्ग आणि तारकर्लीचा समुद्रकिनारा आणि जिभेचे चोचले पुरविणारे मालवणी खाद्यपदार्थ यांच्या आकर्षणाने या परिसरात पर्यटक येत गेले. पाठोपाठ डॉ. सारंग कुलकर्णीच्या प्रयत्नातून एमटीडीसीने सुरू केलेल्या स्नॉर्कलिंगची भर पडून जमिनीवरील निसर्गसौंदर्याच्या आस्वादापाठोपाठ समुद्राच्या पोटातील अद्‌भुत सौंदर्याच्या खजिन्याचे दार धाडसी पर्यटकांसाठी किलकिले केले. यातून युवावर्ग आकर्षित होऊन दर्जेदार पर्यटकांचा ओघ सुरू झाला.

स्नॉर्कलिंगच्या पाठोपाठ या समुद्री पर्यटनाच्या विकासाच्या संधी हेरून दामोदर तोडणकर सारख्या अनेक मच्छीमार युवकांनी स्वबळावर स्नॉर्कलिंगची पुढची पायरी म्हणून स्कूबा डायव्हिंग हा साहसी खेळ सुरू करून रत्नाकराच्या पोटातील अद्‌भुत विश्‍व सर्वसामान्य पर्यटकांना आस्वादासाठी मुक्त केले. आजही या क्षेत्रात केवळ दहा टक्के भाग पर्यटकांच्या दृष्टीने खुला झाला आहे. 

तज्ज्ञांच्यामते सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्कूबा डायव्हिंग या समुद्र तळाचा वेध घेणाऱ्या साहसी क्रीडा प्रकाराची व्यावसायिक क्षमता जवळपास १५०० कोटी रुपयांची आहे. या तुलनेत आज या परिसरात जवळपास ३० ते ३५ स्कूबा डायव्हिंगचे गट कार्यरत असून या सर्वांची मिळून एकत्रित गुंतवणूक १० कोटींच्या पलीकडे नाही आणि हे सर्व मिळून करीत असलेला व्यवसायही १५-२० कोटी रुपयांच्या पलीकडे नाही. याचाच अर्थ या एकाच क्षेत्रात गुंतवणूक आणि व्यवसायाला एवढा प्रचंड वाव अजूनही शिल्लक आहे हे लक्षात येईल. याचठिकाणी शासनाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. या किनारपट्टीवर रापण संघाच्या रूपाने सहकारी तत्त्वावरील मच्छीमारीचे एक ऐतिहासिक प्रारूप व्यावसायिकतेबरोबर समाजभान जपणारे म्हणून पूर्वीपासून उपलब्ध आहे. 

आज स्कूबा डायव्हिंगचे उभे राहिलेले गट हे इथल्या स्थानिक मच्छीमार युवकांनी याच तत्त्वावर स्थापन करून यशस्वीपणे चालविले आहेत. शासनाने आता या सर्वांचा अभ्यास करून या साहसी क्रीडा प्रकाराचे नियमन करून एनसीडीसीच्या धर्तीवर या क्रीडा प्रकारासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे महत्त्वाचे बनले आहे. डॉ. सारंग कुलकर्णीनी खुल्या केलेल्या क्षेत्रात हे डायव्हिंग सुरू आहे पण त्याहीपलीकडे अद्याप अनाघ्रात असलेली अनेक डायव्हिंग क्षेत्रे उपलब्ध आहेत. त्यांचे संशोधन करून ती पर्यटकांसाठी व्यावसायिक तत्त्वावर खुली करताना या संपूर्ण क्रीडा प्रकारासाठी नियमावली तयार करणे हे शासनाचे आद्यकर्तव्य ठरते. आजवर इथल्या स्थानिक युवकांच्या अनुभवाच्या बळावर या क्रीडा प्रकारातील थरार विनाअपघात सर्वसामान्य पर्यटकांना अनुभवता आला. पण म्हणून रामभरोसे राहून चालणार नाही. कारण हळूहळू केवळ पैसे कमाविण्याच्या उद्देशाने काही अनिष्ट प्रवृत्ती या क्षेत्रात उतरू पाहत आहेत.

त्यांना वेळीच या नियमाच्या अंतर्गत आळा घालण्याचे काम न झाल्यास भविष्यात या साहसी पर्यटन प्रकाराला अपघाताचे गालबोट लागू शकते. त्यामुळे आज या क्षेत्रात लक्षावधीची गुंतवणूक करणाऱ्या येथील युवकांनीही शासन दरबारी सुयोग्य नियमावलीसाठी आग्रही राहिलेच पाहिजे. 

स्कूबा डायव्हिंगच्या पाठोपाठ देवबागच्या मनोज खोबरेकरने आपली मुंबईतील राहती जागा वित्तीय संस्थेकडे गहाण ठेवून या जिल्ह्याच्या या किनारपट्टीवर साहसी जलक्रिडा (वॉटरस्पोर्टस्‌) मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या व्यावसायिक धाडसाला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून इथल्या किनारपट्टीवरील युवकांचे अनेक गट या क्रीडा प्रकारात गुंतवणूककर्ते झाले आणि पर्यटकांची पावले पुन्हा एकदा वाढत्या संख्येने देवबाग, तारकर्ली, मालवण परिसरात उमटू लागली. जेटस्की, बनाना राईड, बंपिंग त्या पाठोपाठ केवळ गोवा आणि मुंबईच्या किनारपट्टीवर उपलब्ध असलेला पॅरासिलिंगचा थरार अत्यल्प खर्चात देवबाग, तारकर्लीच्या पाठोपाठ शहरातील चिवल्याच्या समुद्रात पर्यटकांना अनुभवता येऊ लागला. आजवर केवळ किनाऱ्यावर राहून समुद्राच्या पाण्यात पाय बुडविण्यात समाधान मानणाऱ्या पर्यटकांच्यासाठी खोल समुद्रात पॅराशूटच्या साह्याने आकाशात विहार करता करता एका क्षणात फटकन पाण्यात डुबकी मारण्याचा अन्‌ दुसऱ्या क्षणात पुन्हा हवेत झेपावण्याचा अद्वितीय आनंदासह एक वेगळाच थरार देणारा हा पॅरासिलिंगचा खेळ पर्यटकांच्या संख्येत भरच घालतो आहे.

नुकतेच सन्मेश परब आणि त्याच्या ३०-४० सहकाऱ्यांनी एकत्र येत सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच्या उथळ समुद्रात पहिले सागरी जलक्रीडा केंद्र सुरू करून यंदाच्या नाताळ, नववर्षाची सुटी साजरी करण्यास येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक नवे दालन उघडून दिले आहे. ३०-४० लाखांच्या गुंतवणुकीत सी-वॉटर पार्कचे दालन मालवणच्या आकर्षणात आणखीनच भर घालणार आहे. सातत्याने अशा प्रकारची गुंतवणूक या सागरी पर्यटनाच्या क्षेत्रात होत असताना वर म्हटल्याप्रमाणे शासनाने गांभीर्याने या संपूर्ण पर्यटन व्यवसायाच्या नियमनासाठी पावले उचलली पाहिजेत. स्कूबा डायव्हिंगप्रमाणेच जलक्रीडा आणि जलक्रीडा केंद्राची व्यावसायिक क्षमताही अफाट आहे.

अथांग समुद्राच्या विराट पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. ही रहस्ये जगासमोर आणण्यासाठी संशोधनाची गरज आहे. आंग्रीया बॅंकसारखे समुद्राच्या पोटातील बेट भविष्यात पर्यटकांसाठी निराळेच आकर्षण निर्माण करून देण्यासाठी तयार आहे. केवळ आंग्रीया बॅंकसारखे क्षेत्र जवळपास दहा हजार आसांना निरनिराळे प्रकारे रोजगार उपलब्ध करून देऊ शकते आणि या क्षेत्रात काही हजार कोटींची गुंतवणूकही आणू शकते. आंग्रीया बॅंकसारखे क्षेत्र खुले झाल्यास आज केवळ मालवण तालुक्‍याच्या केंद्रित झालेला पर्यटन व्यवसाय रेडीपासून विजयदुर्गपर्यंत आणि त्याही पलीकडे रत्नागिरीपर्यंत विस्तारित होऊ शकतो. भविष्यकाळात सर्व कोकणवासीयांचे हेच उद्दिष्ट असायला हवे. किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायाच्या विस्ताराच्या या संधीबरोबरच या कोकण पट्टीला लाभलेल्या सह्याद्रीच्या रांगातील जंगलवाटा, रॉक क्‍लायबिंगसारखे थरारक खेळ आणि जंगल सफारीसारखे आकर्षण हे आणखीनचे निराळे अद्‌भुत विश्‍व आजही मुक्तपणे खुणावत आहे त्यातील व्यवसाय संधींविषयी मग केव्हातरी.... धन्यवाद.

(शब्दांकन - प्रशांत हिंदळेकर)

 

Web Title: Sindhudurg News priority to Konkan Tourism needed