गृह राज्यमंत्र्यांसमोर सावंतवाडीत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - येथील जिमखाना मैदानावर आयोजित केलेल्या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी होऊन दोघे जखमी झाले. हा सर्व प्रकार गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच घडल्याने मोठ्या संख्येने मैदानात आलेल्या दोन्ही गटांच्या युवकांना शांत करताना पोलिस आणि आयोजकांची दमछाक झाली.

सावंतवाडी - येथील जिमखाना मैदानावर आयोजित केलेल्या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी होऊन दोघे जखमी झाले. हा सर्व प्रकार गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच घडल्याने मोठ्या संख्येने मैदानात आलेल्या दोन्ही गटांच्या युवकांना शांत करताना पोलिस आणि आयोजकांची दमछाक झाली.

एका तासाने तणाव निवळल्यानंतर उर्वरित सामना पूर्ण करण्यात आला. गृह राज्यमंत्र्यांसमोरच घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. यात यशवंतराव कोरगावकर (वय ४५, रा. उभाबाजार) यांनी येथील पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बांदा येथील प्रशांत पांगम व मकरंद तोरसकर या दोघांवर मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धाचा अंतिम सामना शनिवारी (ता. ३) रात्री झाला. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती. सामना रंगात असताना अखेरच्या षटकात खेळाडू आणि एका प्रेक्षकाची शाब्दीक बाचाबाची झाली. या वेळी युवकांना शांत करण्यासाठी त्याठिकाणी गेलेल्या एका सुरक्षारक्षकाला मारहाण झाली. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. काही वेळातच सुमारे ७०० ते ८०० युवकांचा जमाव मैदानात जमा झाला. तणाव वाढल्याने सामना थांबविण्यात आला.

राज्याचे गृह राज्यमंत्री केसरकर, उपअधीक्षक दयानंद गवस व्यासपीठावर उपस्थित होते. तणाव वाढतच असल्याचे पाहून उपअधीक्षक गवस हे पोलिस कर्मचारी घेऊन मैदानात उतरले; मात्र पोलिस बळ कमी असल्याने मैदानावर आलेला जमाव मैदानाबाहेर काढण्यासाठी पोलिस आणि आयोजकांना एक तास लागला. या वेळी झालेल्या मारहाणीत श्री. कोरगावकर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तणाव कमी केल्यानंतर रात्री दीडला उर्वरित सामना पूर्ण करण्यात आला. 

खेळपट्टीवरून बाजूला जाण्यास सांगितल्याने...
या घटनेत जखमी झालेल्या कोरगावकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कोरगावकर यांनी मैदानाच्या खेळपट्टीवर असलेल्या प्रशांत पांगम आणि मकरंद तोरसकर यांना खेळपट्टीवरून बाजूला उभे राहण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्या दोघांनी कोरगावकर यांना मारहाण केली. त्यामध्ये कोरगावकर हे बेशुद्ध झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मारहाणीत आपली ६० हजार किमतीची अंगठी आणि ५५ हजारांची चैन चोरीला गेल्याचे कोरगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून पांगम व तोरसकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sindhudurg News quarrel in front of Home Minister in Sawantwadi