मालवण बाजारपेठेत हाणामारी; दोघांना बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

मालवण - येथील बाजारपेठेत आज सायंकाळी हाणामारी झाली. यात एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर मुक्त असलेल्या राजेश पारकर (रा. मालवण बाजारपेठ) याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह बाजारपेठेतीलच दत्तराज अनिल कासार (वय २९), निखिल सुनील शिंदे (वय २९ रा. धुरीवाडा) या दोघांना बेदम मारहाण केली. 

मालवण - येथील बाजारपेठेत आज सायंकाळी हाणामारी झाली. यात एका पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर मुक्त असलेल्या राजेश पारकर (रा. मालवण बाजारपेठ) याने आपल्या अन्य तीन साथीदारांसह बाजारपेठेतीलच दत्तराज अनिल कासार (वय २९), निखिल सुनील शिंदे (वय २९ रा. धुरीवाडा) या दोघांना बेदम मारहाण केली. 

हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने संशयितांना पकडण्यास पोलिसांना सोयीस्कर ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती. भर बाजारपेठेत झालेल्या मारहाणीची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, नीलेश सोनावणे, सुनील पवार, विल्सन डिसोझा, रामचंद्र साटलकर, सूरजसिंग ठाकूर यांनी घटनास्थळी जात मारहाण झालेल्या दोघांनाही पोलिस ठाण्यात आणून तातडीने

वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. दत्तराज कासार याने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी पकडून त्यांची चौकशी सुरू केली. बाजारपेठेत निखिल शिंदे याच्या व्यायामशाळेत आज सायंकाळी दत्तराज कासार हा व्यायामासाठी आला होता. त्याचदरम्यान तेथे राजेश पारकर व इतर तीन युवक आले. त्यांनी दत्तराज याच्या कॉलरला पकडत व्यायामशाळेबाहेर आणत लाथाबुक्‍क्‍यांनी आणि हाताने बेदम मारहाण केली.

दत्तराज याला सोडविण्यास गेलेल्या निखिल शिंदे यालाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांनी व्यायामशाळेच्या बाहेर असलेल्या दुचाकी पाडून त्यांचे नुकसान करण्यात आले, अशी तक्रार दत्तराज कासार याने पोलिसात दिली आहे. भर बाजारपेठेत चार युवक दोघा युवकांना मारहाण करत असताना एकही व्यक्‍ती त्यांना सोडविण्यास पुढे धावली नाही. अखेर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर संशयित चारही युवकांनी पळ काढला. एक युवक पुन्हा घटनास्थळी आल्यावर त्याला पोलिसांनी थांबविले. 

संशयित राजेश पारकर याच्यावर पोलिस कर्मचाऱ्याला बाजारपेठेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तो सध्या जामिनावर मुक्‍त आहे. यानंतर आता पुन्हा दोघा युवकांना राजेश याने मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे संशयितांना गजाआड करणे सोपे होणार आहे. 

बाजारपेठ दहशतीखाली
भर बाजारपेठेत मारहाणीची घटना घडल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी भीतीने आपली दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले. हाणामारीमुळे संपूर्ण बाजारपेठ दहशतीखाली आली आहे. ही मारहाण पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. राजेश पारकर याच्यासोबत अन्य तीन साथीदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Sindhudurg News qureel in Malvan market