शिरोड्यात जुगाऱ्यांचा पोलिसांवर हल्लाबोल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

वेंगुर्ले - शिरोडा केरवाडा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्लाबोल झाल्याचा प्रकार घडला. यामुळे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार काल सायंकाळी घडला

वेंगुर्ले - शिरोडा केरवाडा येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्लाबोल झाल्याचा प्रकार घडला. यामुळे संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. हा प्रकार काल सायंकाळी घडला. पळून गेलेल्या भालचंद्र नामदेव परबसह पाच जणांना वेंगुर्ले पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या पथकाने आज सकाळी त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटक केली. 

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहिम सुरू आहे. मात्र निर्ढावलेले गुन्हेगार या छापासत्रानंतरही जुगार, मटका, अवैध दारू वाहतूक सुरूच ठेवत असल्याचे चित्र आहे. आता तर कारवाईसाठी आलेल्या पथकावरच हल्लाबोल केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. 

शिरोडा-केरवाडी येथील मैदानाशेजारी अंदरबाहर जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास प्राप्त झाली. यानुसार काल (ता. 25) ला दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील पोलिस निरीक्षक पी. एन. पाटील, पोलिस कर्मचारी विजय तांबे, प्रभू-तेंडोलकर, गोन्सालवीस, तेली या पथकाने सापळा रचून छापा टाकला.

यात भालचंद्र नामदेव परब, प्रविण रामचंद्र मसुरकर, प्रकाश न्हावेलकर, नंदू हणमंत परब व आपा कोते उर्फ साळगांवकर यांना 29 हजार 972 रुपयांच्या मुद्देमालासह पकडले. तेथेच चौकशी सुरु असताना आजूबाजूस असलेल्या 5 ते 6 अज्ञान व्यक्‍तींनी हातात काठ्या घेऊन गैरकायदा जमाव करुन ते पोलिसांच्या दिशेने धावत आले व शिवीगाळ करीत पोलिसांनाच मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीचा फायदा घेत पोलिसांनी ताब्यात घेतलेले पाचही आरोपी पळून गेले. 

या प्रकारात ओरोसचे पोलिस विजय मोहन तांबे यांच्या डोक्‍यास व उजव्या हातास गंभीर मुकामार बसला. त्यामुळे पोलिस त्यांना घेऊन जिल्हा रुग्णालयात गेले. या प्रकरणी विजय तांबे यांच्या तक्रारीनुसार रविवारी रात्रौ 11 वाजता वेंगुर्ले पोलिसात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार भालचंद्र नामदेव परब, प्रविण रामचंद्र मसुरकर, प्रकाश न्हावेलकर, नंदू हणमंत परब, आप्पा कोते उफ साळगावकर यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. 

खाकीतील शुक्राचार्यामुळे गुन्हेगार निर्ढावले 
शिरोडा येथे पोलिसांवर झालेला हल्ला गंभीर म्हणावा लागेल. पोलिसांनी ऑलऑऊट मोहिम सुरू करूनही किनारपट्‌टी भागात जुगाराचे अड्‌डे सुरू आहे. अगदी गोव्यातूनही जुगारी यात सहभाग घेतात. आजही खाकीतील काही शुक्राचार्यांचा अशा प्रकारांना पाठिंबा आहे. त्यामुळेच निर्ढावलेले अवैध धंद्येवाले अशाप्रकारचे कृत्य करण्यास धजावत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Sindhudurg News raid on Shiroda gambling spot