खाणपट्टा कंपन्यांना मुदतवाढ - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील खाणपट्टा चालविणाऱ्या कंपन्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यात डेक्कन मिनरल्स, गोगटे मिनरल्स, डेम्पो मायनिंग अशा सात ते आठ जुन्याच कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व लीज रद्द करून गावातील स्थानिक भूमिपुत्रांना या लिज देण्यात यावा, या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी दिला आहे.

सावंतवाडी - अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील खाणपट्टा चालविणाऱ्या कंपन्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यात डेक्कन मिनरल्स, गोगटे मिनरल्स, डेम्पो मायनिंग अशा सात ते आठ जुन्याच कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व लीज रद्द करून गावातील स्थानिक भूमिपुत्रांना या लिज देण्यात यावा, या मागणीसाठी प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे सरचिटणीस राजन तेली यांनी दिला आहे. तत्पुर्वी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. तेली म्हणाले, ‘‘जिल्ह्यात अनेक खाणी आहेत; परंतु तत्कालीन परिस्थितीत काही खाण मालकांना त्या कंपन्या लीजवर दिल्या आहेत. त्या माध्यमातून खाण मालकांकडुन ठेकेदार नेमुन करोडो रुपयांची माया गोळा केली जात आहे. या सर्व ठेकेदारांकडून स्थानिक ग्रामस्थांना त्रास देण्याबरोबर त्यांना मारहाणीचे प्रकार होत आहे. त्यामुळे त्याचा फटका गावातील एकीवर बसत आहे. दुसरीकडे कंपनीकडून नेमलेल्या ठेकेदाराकडून वेळेवर पैसे दिले जात नसल्यामुळे अनेक डंपर चालकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

अनेकांनी घरातील दागिने शेतजमिनी विकून पैसे परत करण्याची पाळी आल्याचे सांगितले. ही वस्तुस्थिती लक्षात घेता स्थानिक लोक आणि भूमिपुत्रांना या लीज देण्याबाबत केंद्र शासनाने विचार करावा, तशी मागणी आपण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. तसेच ज्या कंपन्यांना लीज वाढवून दिली आहे तो करार रद्द करुन स्थानिकांचा विचार व्हावा याबाबत योग्य तो निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा आमची न्यायालयात दाद मागण्याबरोबर आंदोलन करण्याची तयारी आहे.’’

 

Web Title: sindhudurg news Rajan Teli Comment