चिल्लरांच्या टीकेला उत्तर देत नाही - राजन तेली

चिल्लरांच्या टीकेला उत्तर देत नाही - राजन तेली

सावंतवाडी - आरोग्याचा प्रश्‍न जिल्ह्यासाठी घातक ठरला आहे. तापामुळे होणारे मृत्यू लक्षात घेता आधुनिक रुग्णालय होणे गरजेचे आहे. ते राणेंचे असो वा कोणाचेही, आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढून शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी बुद्धिभेद करून नये. चिल्लर आणि ठेकेदारीवर जगणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, असा टोला माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी राऊळ यांना लगावला. 

जिल्ह्यातील रुग्ण दगावत आहेत; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांना त्याचे सोयरसुतक नाही. त्यामुळे जिल्हा भाजपकडून त्यांचा निषेध करीत आहोत. गृहखाते असूनसुद्धा श्री. केसरकर यांचा वचक नाही. त्यामुळे सांगलीत खून केलेल्या मृतदेहासह असंख्य मृतदेह या ठिकाणी टाकले जातात ही त्यांच्या दृष्टीने लांच्छनास्पद गोष्ट आहे, अशी टीकाही तेली यांनी केली. 

श्री. तेली यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, चंद्रकांत जाधव, शाम काणेकर, राजू गावडे, साक्षी कारिवडेकर आदी उपस्थित होते. तेली यांनी राणेंच्या हॉस्पिटलबाबत केलेल्या विधानाला तालुकाप्रमुख राऊळ यांनी उत्तर दिले होते. श्री. तेली हे राणेंशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते राणेंचे गोडवे गात असून त्यांच्या हॉस्पिटलबाबत चांगले बोलत आहेत, अशी 
टीका केली होती. 

तेली म्हणाले, ‘‘श्री. राऊळ हे माझ्या दृष्टीने चिल्लर आहेत. ठेकेदारीवर जगणाऱ्या लोकांना मी उत्तर देत नाही; 
मात्र दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात आधुनिक हॉस्पिटल गरजेचे आहे. ते राणेंचे असो वा आणखी कोणाचे. त्याबाबत माझी सकारात्मकच भूमिका आहे आणि ती उघड आहे.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात तापसरीच्या आजाराने अनेक रुग्ण दगावले. मात्र पालकमंत्री केसरकर आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत कोणतीही ठोस उपाययोजना करू शकलेले नाहीत. आज जिल्ह्यात रक्ताचे रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी जात आहे. परिणामी अनेक रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन करावे तसेच मृत रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.’’

राऊळ तेलींची मदत घेतात
तालुकाध्यक्ष श्री. सारंग यांनी राऊळ यांना चिमटा काढला. पत्रकार परिषद घेऊन मोठ्या गोष्टी सांगणारे राऊळ अडचणींच्यावेळी रात्री-अपरात्री फोन करून श्री. तेलींचीच मदत घेतात. त्यामुळे त्यांना तेलींवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी नुसत्या फुशारक्‍या मारण्यापेक्षा आपल्या पंचायत समिती मतदारसंघातील ग्रामपंचायती कशा गेल्या याचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com