सावंतवाडी संस्थानच्या सरकार गेल्या...

सावंतवाडी संस्थानच्या सरकार गेल्या...

सावंतवाडी - राजमाता ह.हा. सत्त्वशीलादेवी भोसले यांनी करारी बाणा आणि कर्तबगारीच्या जोरावर निर्माण केलेले कार्य सावंतवाडी संस्थानच्या लौकीकाला साजेसे होते. ‘राणी सरकार’ म्हणून त्यांची असलेली ओळख, लोकमानसात असलेला आदर हा केवळ परंपरेतून नव्हता, तर त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण झाला होता. सावंतवाडी संस्थानला कर्तबगार स्त्री यांची मोठी परंपरा लाभली आहे. याच श्रुंखलेतील राणी सरकार नावाच्या एका वर्पाचा अस्त झाला. 

सावंतवाडी हे छोटसं, पण तेजस्वी संस्थान. याच कारण म्हणजे या संस्थानला, राजघराण्याला लाभलेली तेजपुंज माणसे. या संस्थानात राज घराण्याने आतापर्यंत अनेक आदर्शवत धोरणे राबवली. या संस्थानला राजांप्रमाणेच कर्तबगार िस्त्रयांचाही वारसा लाभला आहे. ह. हा. राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले या श्रृंखलेतील एक. 

राजकारणात आणि समाजकारणात राजघराण्यातील स्त्रियांनी कर्तबगारी गाजवल्याची उदाहरणे सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात ठळकपणे आहे. ब्रिटिश आणि पोर्तुगीजांच्या उपद्रवाला स्वतः रणभूमीत उतरून चोख उत्तर देणाऱ्या दुर्गा बाईसाहेब (१८०८ -१९) यांच्यासह लक्ष्मीबाई (१८०३), नर्मदाबाई, सावित्रीबाई, ताराबाई (१८७९) यांनी प्रत्यक्ष राजकारभारात प्रभावी काम केले. बडोद्याच्या गायकवाड घराण्यात जन्मलेल्या राजमाता पार्वतीदेवी यांनीही कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक मिळविला. हा वारसा राजमाता सत्वशीलादेवी यांनी कणखरपणे पेलला आणि आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली.

राजमातांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ ला बडोद्याच्या गायकवाड घराण्यात झाला. त्यांचे मॅट्रीपर्यंतचे शिक्षण बडोद्यातच झाले; मात्र त्यांचा ओढा कला क्षेत्राकडे होता. चित्रकला, विणकाम, भरतकाम यांचे शिक्षण त्यांनी घेतले. यु. पी. राव हे त्यांचे गुरू. गायकवाड घराण्याचे ऋणानुबंध असलेल्या सावंतवाडी संस्थानात श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह ठरला.

पुण्याच्या कोरगाव पार्कमध्ये हा शाही विवाह सोहळा झाला. शिवरामराजे हे सावंतवाडी संस्थानचे राज्याभिषेक (प्रत्यक्ष राज्यकारभार पाहिलेले) झालेले शेवटचे राजे. ते मुळात विद्वान आणि कलाप्रेमी होते. शिवाय सावंतवाडी संस्थानने अनेक कलांना राजाश्रय दिला होता. यामुळे राजमातांना आपले कार्यकर्तव्य  विस्तारीत करायला संधी मिळाली. हे करत असताना आपली राजघराण्याच्या प्रती असलेली आणि कौटुंबिक कर्तव्य त्यांनी सक्षमपणे पार पाडली. शिवरामराजेंना एक राजा म्हणून व नंतर सक्रीय राजकारणातील कारकीर्दीत त्यांनी मोठ्या तातदीने साथ दिली.

लाखकाम, गंजीफा ही सावंतवाडी संस्थानची ओळख होती; पण ही लोककला लोप पावते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे श्रीमंत शिवरामराजे व राजमाता सत्वशीलादेवी यांच्या लक्षात आले. त्यांनी या कलेच्या पुनरूज्जीवनासाठी पूर्ण ताकदीने काम सुरू केले. सावंतवाडी लॅकरवेअर संस्थेची स्थापना करण्यात आली. ही कला स्वतः राजमातांनी शिकून घेतली. राजमातांनी या कलेतील बारकावे जाणून घेतले. पूर्वी ठराविक घराण्याची मक्तेदारी असलेली ही कक्षा खुली केली. राजवाड्यात ही कला उर्जितावस्थेत ठेवण्याचे काम आजही चालते. कागदाच्या लगद्यापासून शोभिवंत वस्तू बनविण्याचे कौशल्य त्यांनी खुले केले. सावंतवाडी महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या माध्यमातून हस्तकला, व्यवसायाला प्रोत्साहन दिले. १९८२ ला शिवराम राजेंना हस्तकला महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. याच्या माध्यमातूनही त्यांनी येथील हस्तकलेला व्यावसायिक स्वरूप देत अनेकांना रोजगाराची दिशा दिली. 

राजमाता अत्यंत करारी, स्वाभिमानी, शिस्तीच्या आणि वक्तशीर होत्या. त्यांची स्मरणशक्ती अचाट होती. याच जोरावर त्यांनी शिवरामराजेंनी सुरू केलेल्या पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कार्यकक्षा विस्तारल्या. ‘केजी टू पीजी’ शिक्षण देणारे संकुल त्यांच्याच काळात विस्तारत गेले. आपल्या ८३ वर्षाच्या कारकीर्दीत ‘राणी सरकार’ ही त्यांनी निर्माण केलेली ओळख केवळ परंपरेने नव्हे तर कर्तृत्वाने निर्माण झालेली होती. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com