रायवळ आंबा उत्पादनाकडे लक्ष द्यावे - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कणकवली - हापूस आंब्याला अधीर महत्त्व असले तरी खऱ्या अर्थाने नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या रायवळ आंब्याची लागवड आतापासून केल्यास भविष्यात आर्थिक फायदा मिळणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने रायवळ आंबा लावडीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी करंजे येथे बोलताना केले.

कणकवली - हापूस आंब्याला अधीर महत्त्व असले तरी खऱ्या अर्थाने नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या रायवळ आंब्याची लागवड आतापासून केल्यास भविष्यात आर्थिक फायदा मिळणार आहे. त्यामुळे तरुण पिढीने रायवळ आंबा लावडीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी करंजे येथे बोलताना केले.

स्नेहसिंधू पदवीधर संघ आणि श्री रवळनाथ शेती समूह  गटाच्या वतीने रायवळ आंबा लागवड अभियानाला करंजे येथे सुरूवात झाली. यावेळी वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कृषी पदवीधरचे हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, संतोष परब, शेखर सावंत, संजय सावंत, मंगेश तळवणेकर, बबन घोणे, तसेच करंजेतील ग्रामस्थ आणि मराठे कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत उपस्थित होते. 

सावंत म्हणाले,‘‘जुन्या पिढीतील लोकांनी रायवळ आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हिंदू धर्माच्या अनेक विधींसाठी हा आंबा तोडण्यात आला. त्यामुळे रायवळ आंब्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. त्यामुळे रायवळ आंब्याची लागवड फार महत्वाची आहे. पुढील पिढीला या आंब्याच्या जातीही पाहता येणार नाहीत. जंगलमय भागात विशेषतः सह्याद्री भागात रायवळ लागवड झाली तर वन्य प्राण्यांचा त्रासही कमी होणार आहे. 

डॉ. हळदवणेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील रायवळ आंबा हा नाश पावलेला आहे. पूर्वी याच रायवळ आंब्यासाठी मोठी मागणी होती. त्याची लागवडही मोठ्या प्रमाणात होती. आता या रायवळ आंब्याचे महत्व समजू लागले आहे. याचे कारण हवामानामुळे हापूस आंब्याचे पीक धोक्‍यात येवू लागले आहे. या बदलत्या हवामानात रायवळ आंबा चांगले उत्पादन देणारा ठरत आहे. फळ संशोधन  केंद्रात याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. 

करंबेळकर म्हणाले, ‘‘बाजारात रायवळ आंब्याच्या आमसुलाला मोठी मागणी आहे. कृषी पदवीधर संघाने या आमसुलाला बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.सध्या ग्रामीण भागातील हा रायवळ आंबा कमी किंमतीत खरेदी केला जातो. मात्र याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर जिल्ह्यात आर्थिक उलाढाल वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

Web Title: sindhudurg news rayval mango plantation