भरकटलेल्या बोटीला वाचविण्यात यश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मालवण - मुंबई येथून समुद्रमार्गे गोव्याला निघालेली "सुनीता' नावाची शिडाची बोट आज सकाळी वेंगुर्ले निवती रॉक परिसरातील खोल समुद्रात भरकटल्याची घटना घडली. या वेळी बोटीवर गोवा येथील चार प्रवासी होते. त्यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला.

मालवण - मुंबई येथून समुद्रमार्गे गोव्याला निघालेली "सुनीता' नावाची शिडाची बोट आज सकाळी वेंगुर्ले निवती रॉक परिसरातील खोल समुद्रात भरकटल्याची घटना घडली. या वेळी बोटीवर गोवा येथील चार प्रवासी होते. त्यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला.

जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानंतर तत्काळ सागरी पोलिसांनी मालवणहून स्पीड बोटीच्या मदतीने रेस्क्‍यू ऑपरेशन राबवीत भरकटलेल्या बोटीला संपलेल्या इंधनाचा पुरवठा करत सुरक्षितरीत्या गोव्याच्या दिशेने रवाना केले. 

मुंबई येथे नव्याने तयार करण्यात आलेली सुनीता ही शिडाची बोट गोवा येथे पर्यटन व्यवसायासाठी क्‍लबच्या माध्यमातून नेण्यात येत होती. मुंबई येथून गुरुवारी (ता. 5) निघालेली ही बोट शनिवारपर्यंत गोवा येथे पोचणे अपेक्षित होते; मात्र खराब हवामानाचा फटका बसल्याने शिडाचा वापर होत नव्हता. अशा स्थितीत पर्यायी स्वरूपात असलेले इंधनही सततच्या वापरामुळे संपले. आज सकाळी आठच्या सुमारास सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील वेंगुर्ले निवती रॉक परिसरातील समुद्रात ही बोट भरकटत खोल समुद्रात जात होती.

बोटीवर असलेले चार कर्मचारी प्रवासी मिलिंद प्रभू, हेमंत आरोंदेकर, किरीट मगनलाल, जयदास चुनेकर यांनी मदतीसाठी गोवा व मुंबई येथील पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला. तेथून सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनास या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अप्सरा स्पीडबोटीतून पोलिस उपनिरीक्षक ए. बी. साठे, एस. पी. खांदारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. तोरसकर, पोलिस कर्मचारी आशिष भाबल, एम. डी. साबळे, पी. डी. टेकाळे, के. इ. कुमठेकर, झेड. एच. शिरगावकर यांनी अवघ्या अर्ध्या तासात मालवण येथून निवती रॉक परिसरातील सुमारे 20 वाव खोल समुद्रात भरकटलेल्या नौकेला गाठले. नौकेची खातरजमा केली. बोटीवरील कर्मचाऱ्यांना आधार दिला. नौकेवरील इंधन संपल्याने वेंगुर्ले बंदरातून आवश्‍यक तो इंधन पुरवठा बोटीला करण्यात आला. त्यानंतर भरकटलेली ही नौका गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या कामगिरीमुळे सिंधुदुर्ग पोलिस दलाचे कौतुक करत नौकेवरील कर्मचाऱ्यांनी आभार मानले. 
 

Web Title: sindhudurg news rescue operation in Nivati rock region