वैभववाडी तालुक्यातील डाटा आॅपरेटरांचे सामुदायिक राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

वैभववाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या 17 केंद्रचालकांना (डाटा ऑपरेटर) गेल्या वर्षभरापासुन मानधन न मिळाल्यामुळे सर्वांनी तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामुहिक राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत केंद्रचालकांनी कैफियत मांडली. 

वैभववाडी - तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या 17 केंद्रचालकांना (डाटा ऑपरेटर) गेल्या वर्षभरापासुन मानधन न मिळाल्यामुळे सर्वांनी तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामुहिक राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत केंद्रचालकांनी कैफियत मांडली. 

तालुक्‍यातील 17 ग्रामपंचायतीच्या डाटा ऑपरेटर्सनी आज एकाच दिवशी तालुकासमन्वयक पाटील यांच्याकडे आपले सामुहिक राजीनामे सुपुर्द केले. यापुढे ग्रामपंचायतीचे कोणतेही काम न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी तालुका समन्वयक, सभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. एप्रिल 2017 पासुन आजपर्यत केंद्रचालकांनी नियमित काम केले आहे. मात्र गेल्या वर्षभरापासुन सर्व केंद्रचालकांना मानधन देण्यात आलेले नाही.

याबाबत त्यांनी सीएससीएसपीव्ही कंपनी आणि प्रशासनाकडे सतत मागणी केली परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आज अखेर सर्व चालकांनी सामुहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची सभा येथील आंबेडकर भवनात झाली. सभेला स्नेहा वायंगणकर, दिपश्री अटेकेकर, प्रसिद्धी पवार, श्रद्धा सांवत, रूपाली रावराणे, उदय फोंडके, जयराज हरयाण, रूपेश कांबळे, महेश दळवी, तुषार हडशी, हेमंत साळुंखे, विधी नारकर, अक्षय कांबळे, प्रशांत पांचाळ, महेश पाटील, राजेंद्र कदम, विशाल जाधव आदी उपस्थित होते.

या सभेत राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तालुका समन्वयक पाटील यांच्याकडे राजीनामे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर सर्वानी सभापती लक्ष्मण रावराणे आणि गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांची भेट घेवुन कैफियत मांडली. जोपर्यत एक वर्षाचे मानधन दिले जात नाही तोपर्यत काम न करण्याचा निर्णय केंद्रचालकांनी घेतला आहे. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

कारभार होणार ठप्प... 
ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात येणार बहुतांशी दाखले संगणकाद्वारे दिले जातात. हे काम केंद्रचालकच करीत असतात. आज सर्वच केंद्रचालकांनी राजीनामे दिल्यामुळे तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प होणार आहे. 

दाद मागायची कुठे?... 
मानधन मिळत नसल्याबाबत या केंद्रचालकांनी तालुक्‍यातील अनेक लोकप्रतिनिधींचे दरवाजे ठोठावले, मात्र त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. या विषयाशी संबंधीत जवळपास सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्यात आला. त्या सर्वांनी तुमच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. तुमच्या पगाराचा आमच्याशी संबंध येत नाही. ते काम संबंधीत ठेकेदार कंपनीचे आहे असे सांगून सर्वांची निराशा केली. यामुळे या सर्वांना आपण दाद मागायची कुठे असा प्रश्‍न पडला आहे. 

Web Title: Sindhudurg News Resignation of Data Operators