पॉलिशच्या बहाण्याने भामट्यांनी लुबाडले 78 हजारांचे दागिने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

वैभववाडी - दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने नाधवडे येथील सौ. शोभा शिवाजी जाधव यांचे ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन भामट्यानी लंपास केले. हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला.

वैभववाडी - दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने नाधवडे येथील सौ. शोभा शिवाजी जाधव यांचे ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन भामट्यानी लंपास केले. हा प्रकार सकाळी अकराच्या सुमारास घडला.

नाधवडे कांबळे हॉटेल थांब्याजवळ शोभा जाधव राहतात. त्या सकाळी अकराच्या सुमारास अंगणात असताना दोन अनोळखी व्यक्ती तेथे दुचाकीवरून आल्या. त्यांनी सौ. जाधव यांना फरशी पॉलिश करून देतो, असे सांगितले. या वेळी सौ. जाधव यांनी पती बाहेरगावी आहे. ते १० मेस येणार आहेत, असे सांगितले. दोघांनी आपण सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करतो, असे सांगितले. त्या वेळी त्या महिलेने आपल्या पायातील चांदीची साखळी त्यांच्याकडे दिली. अवघ्या चार-पाच मिनिटात साखळी चकाचक करून त्यांना परत दिली. त्यामुळे त्यांचा विश्‍वास वाढला. त्यांनी मंगळसूत्र, चेन आणि झुमके पॉलिश करण्यासाठी त्यांच्याकडे दिले. ते सर्व दागिने त्यांनी आपल्याजवळील एका भांड्यात टाकले. पाच सहा मिनिटांनी त्यांनी एक डबी त्या महिलेच्या हातात दिली आणि दहा मिनिटांनी ती उघडा असे सांगून ते दुचाकीवरून तळेरेच्या दिशेने निघून गेले.
सौ. जाधव यांनी दहा मिनिटांची वाट न पाहता अवघ्या पाच मिनिटांत डबी उघडली; तेव्हा त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला; परंतु तत्पूर्वीच ते भामटे पसार झाले होते. 

सौ. जाधव यांनी आपले ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर, हवालदार संजय खाडे यांनी घटनास्थळी जावून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Sindhudurg News robbery of gold ornaments