राजन तेलींकडून राणेंशी सलगीचा प्रयत्न - रुपेश राऊळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी सलगी करण्यासाठी माजी आमदार राजन तेली त्यांच्या बाजूने बोलत आहेत; मात्र आपल्या मुलावर हल्ला झाल्यानंतर याच तेलींनी राणेंची प्रतारणा धृतराष्ट्र म्हणून केली होती, हे ते विसरले का? असा सवाल येथे शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी सलगी करण्यासाठी माजी आमदार राजन तेली त्यांच्या बाजूने बोलत आहेत; मात्र आपल्या मुलावर हल्ला झाल्यानंतर याच तेलींनी राणेंची प्रतारणा धृतराष्ट्र म्हणून केली होती, हे ते विसरले का? असा सवाल येथे शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केला.

पालकमंत्री दीपक केसरकर हे सर्वसामान्यांचे आहेत. हुकूमशाही किंवा धाकदपटशाही करून ते काम करून घेत नाहीत. याचा अर्थ त्याचा प्रशासनावर अंकुश नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही राऊळ म्हणाले.

श्री. तेली यांनी केसरकरांवर केलेल्या टिकेला श्री. राऊळ यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी शहरप्रमुख शब्बीर मणीयार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, गजानन नाटेकर, समिर मामलेकर, संदेश गुरव, विश्‍वास घाग आदी उपस्थित होते. 

श्री. राऊळ म्हणाले, ‘‘राणेंचे अचानक गोडकौतुक करणाऱ्या तेलींना आता त्यांच्याशी सलगी करायची आहे. त्यामुळे ते त्यांच्या बाजूने बोलत आहेत. राणेंना रामराम करीत अन्य पक्षात जाताना त्यांनी राणेंच्या विरोधात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका आहे, असे प्रतिज्ञापत्र का घातले होते याचे उत्तर द्यावे. तेलींचे राजकारण हे स्वार्थी आणि सोईचे आहे. ते आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात. रात्री त्यांना कोणते स्वप्न पडले की ते सकाळी येवून पत्रकार परिषद घेतात आणि मिळेल त्याच्यावर टीका करतात; मात्र आमचे पालकमंत्री असे नाहीत. सर्वसामान्य लोकांची कामे व्हावीत म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृत कामाला थारा दिलेला नाही. हे एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या तेलींना कळणार नाही.’’

तेलींना पक्षातून बाजूला केले
मुख्यमंत्री ग्रामसडकच्या आरोपाबाबत श्री. राऊळ म्हणाले, ‘‘श्री. तेली हे शासनाचे घटकातील सदस्य आहेत. असे असताना त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेत घोटाळा झाला हे सांगावे लागते, हे त्यांचे दुदैव आहे. त्यांना आता पक्षापासून बाजूला केले आहे. कणकवली निवडणुकीत तसे दिसून आले.’’

Web Title: Sindhudurg News Rupesh Raul press