मी असेन-नसेन, जादा निधी मिळेल...- सभापती मडगावकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - येथील पंचायत समितीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. या वेळी कमी निधी दिल्याच्या कारणावरून सर्व सदस्यांनी सभापती रवी मडगावकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हा परिषदमधून मिळालेल्या निधीनुसार हे वाटप केले आहे; मात्र पुढच्या अर्थसंकल्पात मी असेन किंवा नसेन त्या वेळी जास्तीचे पैसे मिळतील, असे त्यांनी सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सावंतवाडी - येथील पंचायत समितीचा अर्थसंकल्प आज सादर झाला. या वेळी कमी निधी दिल्याच्या कारणावरून सर्व सदस्यांनी सभापती रवी मडगावकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हा परिषदमधून मिळालेल्या निधीनुसार हे वाटप केले आहे; मात्र पुढच्या अर्थसंकल्पात मी असेन किंवा नसेन त्या वेळी जास्तीचे पैसे मिळतील, असे त्यांनी सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हाच धागा पकडून भाजपचे सदस्य शीतल राऊळ यांनी असेन नसेन म्हणता ते पक्षात तुमचे कोणी पाय ओढतो का? असा प्रश्‍न करत थेट भाजपत येण्याचे आवताणच देऊन टाकले. त्यांच्यावर होत असलेली टीका पाहून काँग्रेसचे सदस्य पंकज पेडणेकर यांनी त्यांची बाजू घेतली.

येथील पंचायत समितीचा ५७ लाखांचा अर्थसंकल्प आज विशेष सभा घेऊन सादर केला. या वेळी झालेल्या चर्चेत आपल्याला कमी पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे ते जास्त देण्यात यावे, अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह सर्वच सदस्यांनी लावून धरली. या वेळी मडगावकर म्हणाले, ‘‘आम्हाला जिल्हा परिषदकडून ५७ लाख रुपये मिळणार आहेत. त्यातील प्रत्येक सदस्याला ६५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.’’

हा निधी कमी आहे. आणखी दहा हजार रुपये वाढवून देण्यात यावेत, अशी मागणी राऊळ यांच्यासह संदीप गावडे, शीतल राऊळ, बाबूराव सावंत यांनी केली. या वेळी ५७ लाख मंजूर असले तरी आता मात्र २८ लाख आता मिळणार आहेत. उर्वरित रक्कम कधी मिळेल, हे माहिती नाही. त्यामुळे आता मिळेल तो निधी देण्यात येणार आहे. त्यातून लाभार्थींना ताडपत्री व अन्य वस्तू देण्यात येणार आहेत.

या वेळी राऊळ यांनी मडगावकर यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला व आणखी दहा हजार रुपये वाढवून द्या, असे सांगितले. या वेळी आपण सभापतीच्या काळात सर्व सदस्यांना समान निधी वाटप केला आहे. मागच्या काळात एकाच मतदारसंघात हा निधी गेला होता. तसे कोणतेही काम केले नाही. त्यामुळे पुढच्यावेळी जास्त निधी येईल, अशी आशा आहे.

त्या वेळी आपण सभापतीपदावर असेन किंवा नसेन; पण त्याचे निश्‍चितच चांगले वाटप करण्यात येईल, असे मडगावकर यांनी सांगितले. त्यांचे हे उत्तर ऐकून ‘तुम्ही असे का बोलला, तुमचे पक्षात कोणी पाय ओढतो का?’ असा प्रश्‍न करून भाजपचे सदस्य राऊळ यांनी आमच्या पक्षात या, असे आवताण दिले. या वेळी राजकारण आणि पद याबाबत कोणाचे खरे नसते, असे सांगून मडगावकर यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
सभेच्या शेवटी काँग्रेसचे सदस्य बाबू सावंत यांनी मडगावकर यांना घरचा आहेर दिला.

अशाप्रकारे कमी निधी मिळत असल्यामुळे आम्ही आमच्या लाभार्थ्यांना काहीच देऊ शकत नाही. त्यामुळे मतदारसंघात फिरताना आम्हाला लाज वाटते. त्यामुळे निधी वाढवून मिळण्यासाठी योग्य तो ठराव घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. आयत्यावेळच्या विषयात राऊळ यांनी बांदा येथे १०८ रुग्णवािहकेची गैरसोय होत आहे. आठवड्यापूर्वी एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली.

पालकमंत्र्यांकडे निधी मागा...
चर्चा सुरू असताना निधी वाटपावरून सदस्य रुपेश राऊळ यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. जास्तीचा निधी द्या, अशी मागणी केली. या वेळी काँग्रेसचे सदस्य संदीप नेमळेकर यांनी या वादात उडी घेतली. सभागृहात गोंधळ घालून उपयोग नाही, पालकमंत्री तुमचेच आहेत. त्यामुळे निधी वाढवून देण्याची मागणी त्यांच्याकडेच करा, असे त्यांनी राऊळ यांना सांगितले.

Web Title: Sindhudurg News Sabhapati Madgavkar comment