ऐतिहासिक "शिवराजेश्‍वर'चे होणार संवर्धन - संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मालवण - छत्रपती शिवाजी महाराजांचे येथील किल्ले सिंधुदुर्गवरील ऐतिहासिक शिवराजेश्‍वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे केली होती. त्या संदर्भात दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाच्या महानिदेशक उषा शर्मा यांनी बैठक घेतली.

मालवण - छत्रपती शिवाजी महाराजांचे येथील किल्ले सिंधुदुर्गवरील ऐतिहासिक शिवराजेश्‍वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे केली होती. त्या संदर्भात दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाच्या महानिदेशक उषा शर्मा यांनी बैठक घेतली. या बैठकीत शिवराजेश्‍वर मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासंदर्भात मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्यानुसार आवश्‍यक त्या सर्व परवानग्या काल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आल्या. 

दरम्यान, पुरातत्त्व खात्याच्या निगरानीखाली या मंदिराचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकर सुरू केले जावे, असे स्पष्ट निर्देश संभाजीराजे यांच्या उपस्थितीत उषा शर्मा यांनी दिले. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी व पुरातत्त्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

किल्ले सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरात पसरलेले असून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती विराजमान असलेले एकमेव मंदिर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे महाराष्ट्रातील असे मंदिर आहे जेथे सर्व प्रकारचे सण, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे हे मंदिर महाराष्ट्रातील तमाम शिवभक्‍तांचे श्रद्धास्थान आहे, असे संभाजीराजे यांनी पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आणून दिले. 

भारत सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर या मंदिराच्या संवर्धनाचे काम ठप्प पडले. त्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यातील काम, सभा मंडपाचे काम यासह बऱ्याच ठिकाणी मंदिरात पाण्याची गळती होते. यामुळे शिवप्रेमींकडून मंदिराच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्‍त केली जात असल्याची बाब खासदार संभाजीराजे यांनी ऑगस्ट 2017 मध्ये पुरातत्त्व विभागाबरोबर झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. 

राज्य शासनाने वारंवार पुरातत्त्व विभागाशी पत्र व्यवहार करून या मंदिराचे काम सुरू करणे आवश्‍यक असल्याचे पटवून दिल्यानंतरही कामाला पुरातत्त्व खात्याकडून परवानगी मिळत नव्हती. काल खासदार संभाजीराजे यांनी तमाम शिवभक्‍तांच्या भावना पुरातत्त्व खात्याच्या महानिदेशक उषा शर्मा यांना सांगितल्या. यावर त्यांनी संवर्धनाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

शासनाकडून जो निधी मंदिराचे संवर्धन करण्यासाठी आला आहे तो निधी तसाच पडून आहे. त्यामुळे मंदिराला सुस्थितीत ठेवण्यासाठी व दुरुस्तीसाठी शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यास परवानगी देण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्त्व खात्याकडे यापूर्वी झालेल्या बैठकीत केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराचे जे रखडलेले काम आहे ते सुरू करण्यासंदर्भात काल भारतीय पुरातत्त्व खात्याने परवानगी दिल्यामुळे शिवभक्‍तांची जी अनेक दिवसांची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. 

पुरातत्त्व विभागाबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पन्हाळा गडावर लाइट ऍण्ड साउंड शो सुरू करण्यास या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. 

Web Title: Sindhudurg News Sambhajiraje Chhatrapati Comment