स्वाभिमान आघाडीचा आता गट स्थापन; गटनेतेपदी संजय कामतेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

कणकवली - नगरपंचायतीमधील महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी आघाडीच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी केली. गटनेतेपदी संजय कामतेकर असणार आहेत. सोमवारी (ता. १६) शिवसेना आणि भाजप युतीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली होती.

कणकवली - नगरपंचायतीमधील महाराष्ट्र स्वाभिमान आणि राष्ट्रवादी आघाडीच्या गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी केली. गटनेतेपदी संजय कामतेकर असणार आहेत. सोमवारी (ता. १६) शिवसेना आणि भाजप युतीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केली होती.

कणकवली नगरपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमानचे १० तर राष्ट्रवादी १ असे ११ सदस्यांचे आघाडीचे संख्याबळ आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यापूर्वी आघाडीच्या गटनेतेपदी कामतेकर यांची निवड झाली. स्वाभिमानचे पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी श्री. कामतेकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केल्यानंतर गटनोंदणीसाठी अर्ज केला.

गटनेते कामतेकर यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, अभिजित मुसळे, बंडू हर्णे, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, उर्मी जाधव, रवींद्र गायकवाड, विराज भोसले आणि राष्ट्रवादीचे आबिद नाईक यांचा आघाडीत समावेश आहे. नोंदणीवेळी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, किशोर राणे, दिलीप वर्णे आदी उपस्थित होते.

नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बहुमत मिळवल्यानंतर थेट नगराध्यक्षपदी समीर नलावडे निवडून आले; मात्र या सर्वांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कामतेकर यांची निवड केल्याची चर्चा होती. विकासकामे, अन्य ठरावांवेळी गटनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. गटनेत्याने व्हीप काढल्यास त्याची अंमलबजावणी त्या गटातील सदस्यांना करावीच लागते.

राजपत्रात प्रसिद्धीनंतर अंतिम नोंदणी
आघाडीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणीसाठी अर्ज सादर केल्यानंतर या अर्जावर आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सह्या घेतल्यानंतर या गटाची नोंदणी आणि प्रसिद्धी गॅझेटमध्ये होणार आहे. त्यानंतरच हा गट अंतिमरित्या नोंदणीकृत होईल.

Web Title: Sindhudurg News Sanjay Kamtekar as Group leader of Swabhiman