भोसलेंइतकेही काम केसरकरांकडून नाही - संजू परब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - दीपक केसरकर यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या प्रविण भोसले यांनी मंत्री असताना जेवढे प्रकल्प जिल्ह्यात आणले, तेवढासुद्धा विकास करायला पालकमंत्री केसरकर यांना जमले नाही. खोटी आकडेवारी सांगून आणि नारायण राणेंवर टीका करून ते जिल्ह्यातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. ही शोकांतिका आहे, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी येथे केली.

सावंतवाडी - दीपक केसरकर यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या प्रविण भोसले यांनी मंत्री असताना जेवढे प्रकल्प जिल्ह्यात आणले, तेवढासुद्धा विकास करायला पालकमंत्री केसरकर यांना जमले नाही. खोटी आकडेवारी सांगून आणि नारायण राणेंवर टीका करून ते जिल्ह्यातील लोकांची दिशाभूल करीत आहेत. ही शोकांतिका आहे, अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी येथे केली.

श्री. केसरकर यांनी आरोग्याचा प्रश्‍न येत्या तीन महिन्यांत सोडवावा; अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारासुद्धा या वेळी त्यांनी दिला. श्री. परब यांनी येथील माजी खासदार नीलेश राणे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. 

श्री. परब म्हणाले, ‘‘गोवा बांबुळी येथे उपचारासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय तेथील शासनाने घेतल्यानंतर पालकमंत्री केसरकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यात श्रेयवादासाठी चढाओढ सुुरू झाली; मात्र गेली तीन वर्षे हे सत्तेत आहेत. अशा प्रकारे आरोग्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यापेक्षा आपल्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयात चांगल्या सुविधा आणि डॉक्‍टर उपलब्ध करून दिले असते तर चांगले झाले असते. तशी काहीही चर्चा झाली नाही. उलट दोघांनीही गोव्याच्या जीवावर आश्‍वासने दिली आहेत. जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यांच्या दृष्टीने कोणीच गंभीर नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यापेक्षा केसरकर यांचे पूर्वीचे मित्र प्रवीण भोसले हे राज्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात उपजिल्हा दर्जाची रुग्णालये, आयटीआय असे अनेक प्रकल्प आणले होते; मात्र यातील केसरकर यांना काहीच जमले नाही.’’

या वेळी पालिकेचे गटनेते राजू बेग, शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, नगरसेवक उदय नाईक, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

तर जठारांची विकेट निघेल
श्री. परब म्हणाले, ‘‘केसरकर शिवसेनेचे मंत्री आहेत; मात्र त्यांची निष्ठा फक्त मुख्यमंत्र्यांवरच आहे. ते बऱ्याच वेळा मुख्यमंत्र्यांचेच गोडवे गातात. भाजपच्या नेत्यांचे गुणगान गातात. दुसरीकडे ते शिवसेनेत राहून संघटना संपविण्याचे काम करत आहेत. हीच परिस्थिती बदलण्यासाठी शिवसैनिकांनी आता योग्य ती भूमिका घ्यावी. अन्यथा केसरकर कधी भाजपात जातील हे कळणारसुद्धा नाही. त्यामुळे प्रमोद जठार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावध व्हावे, अन्यथा तुमची विकेट कधी निघेल सांगता येत नाही.’’ 

Web Title: Sindhudurg News Sanju Parab Press