सरपंचांनी तळागाळात आदर्शवत कामे करावी - खासदार राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कुडाळ -  शिवसेनेच्या सर्व सरपंचाची कारकीर्द यशदायी व गावातील लोकांचे आशीर्वाद घेणारी ठरावी, असे आदर्शवत काम करा. शासनाच्या योजना तळागाळात पोचवून विकास साधा, असे आवाहन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सरपंच व सदस्य विजयी मेळाव्यात केले. तालुक्‍यात शिवसेनेचे २३ सरपंच निर्विवादपणे विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला.

कुडाळ -  शिवसेनेच्या सर्व सरपंचाची कारकीर्द यशदायी व गावातील लोकांचे आशीर्वाद घेणारी ठरावी, असे आदर्शवत काम करा. शासनाच्या योजना तळागाळात पोचवून विकास साधा, असे आवाहन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सरपंच व सदस्य विजयी मेळाव्यात केले. तालुक्‍यात शिवसेनेचे २३ सरपंच निर्विवादपणे विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने शिवसेनेने तालुक्‍यात चांगले यश मिळविले. निवडून आलेले सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळा त्यांना मार्गदर्शन या अनुषंगाने पाडव्याला विजयी मेळाव्याचे आयोजन महालक्ष्मी सभागृहात खासदार श्री. राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.

या वेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, संजय पडते, सभापती राजन जाधव, जान्हवी सावंत, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, राजू कविटकर, अनुप्रिती खोचरे, प्रकाश परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अनुप नाईक, श्रेया परब, शिल्पा घुर्ये, सचिन सावंत, जयभारत पालव, बबन बोभाटे, संतोष शिरसाट, संजय भोगटे, प्राजक्ता प्रभू, शितल कल्याणकर, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राऊत म्हणाले,‘‘गावाच्या सर्वांगीण विकासात सरपंच हा महत्वाचा घटक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत गतिमान विकास व्हावा, यासाठी ग्रामपंचायती ‘ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्क’ने जोडण्याचे काम सुरू करणार आहे. सर्व सरपंचांना वर्षातून एकदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ३२५ ही ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. तालुक्‍यात सरपंचपदाची संख्या वाढली असून गाव पॅनलचे काही सरपंच लवकरच आमच्याकडे येतील.’’

आमदार नाईक म्हणाले,‘‘तालुक्‍यात २३ सरपंचाची दिवाळी भेट आम्ही दिली आहे. शिवसेनेच्या सरपंचाकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्यामुळेच त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसविले. शिवसेना वाढत चालली आहे. गाव पॅनलच्या सरपंचानंतर आमचे सरपंच वाढणार आहेत. नवीन पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणेंच्या पक्षाला भविष्यात जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. सरपंच व सदस्यांनी जनतेचा विश्‍वास संपादन केला पाहिजे. अनेकांच्या अडचणींना धावून जाणारा असावा.’’

आमदार नाईकांचे टाळ्यांनी कौतुक
कुडाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सरपंच निवडून आणण्यात आमदार वैभव नाईक व त्यांचे सहकारी यांचे फार मोठे योगदान आहे. बोलतो ते करतो असा आमचा वैभव असल्याने त्यांचे सभागृहात टाळ्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर अभिनंदन करण्यात आले.

‘स्वाभिमान’ म्हणजे राणेंचा त्रिकोण...
नारायण राणे यांना काढलेला स्वाभिमान पक्ष हा राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्याचे स्वरुप नारायण राणे, नीलेश राणे व नीतेश राणे असे त्रिकोणी म्हणावे लागेल. त्यामुळे या पक्षाचा कोणी विचार करण्याची गरज नाही. त्यांनी शिवसेनेशी स्पर्धा करण्याचे काम करू नये. कारण आमचे दैवत जिल्ह्यातील जनता व कार्यकर्ते आहे. तेच त्यांना वारंवार आपटत आहेत. शिवसेनाप्रमुखांना दुःख देणाऱ्यांची अशीच अधोगती होणार असा आरोप राऊत यांनी या वेळी केला.

Web Title: Sindhudurg News Sarpanch Victory Rally