‘गोमेकॉ’ची टिमकी वाजविणे बंद करा - सतीश सावंत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सावंतवाडी - गोवा-बांबूळी येथील गोमेकॉमध्ये मोफत रुग्णसेवा करून घेतली, अशी जिल्ह्यात येऊन घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता टिमकी वाजविणे बंद करून जिल्ह्यातील रुग्णांची पर्यायी व्यवस्था काय केली? याचे उत्तर द्यावे, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

सावंतवाडी - गोवा-बांबूळी येथील गोमेकॉमध्ये मोफत रुग्णसेवा करून घेतली, अशी जिल्ह्यात येऊन घोषणा करणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आता टिमकी वाजविणे बंद करून जिल्ह्यातील रुग्णांची पर्यायी व्यवस्था काय केली? याचे उत्तर द्यावे, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत लगावला.

गोवा-बांबूळी येथील ‘गोमेकॉ’मध्ये मोफत उपचार मिळणे गरजेचे आहे; मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांना जिल्ह्यातील रुग्णांचे प्रश्‍न सोडविणे जमणार नाही. सत्तेत असतानाही आरोग्यासाठी निधी उपलब्ध करून देणे जमत नसेल तर चांदा ते बांदा योजनेत आरोग्याचा समावेश करावा, असेही सावंत म्हणाले. येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची मासिक बैठक आज झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. 

गोव्याने याचाही विचार करावा
श्री. सावंत म्हणाले, ‘‘रुग्णसेवा विकत द्यावी की मोफत याबाबतचा निर्णय गोवा शासनाचा आहे. त्यामुळे आपण त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही; मात्र माणुसकीच्या नात्याने तसेच या कॉलेजला मान्यता मिळण्यासाठी अखंड रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. त्याचमुळे गोवा बांबुळी महाविद्यालय उभे राहू शकले, हेसुद्धा गोवा शासनाने विसरू नये.’’

श्री. सावंत म्हणाले, ‘‘गोवा बांबूळी येथे शासकीय रुग्णालयात गेली अनेक वर्षे मोफत देण्यात येणारे उपचार सशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कालपासून (ता. १) तो अंमलात आला. त्याचा थेट फटका जिल्ह्यातील जनतेला बसणार आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री केसरकर आणि जिल्ह्याच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही स्वाभिमान पक्षाच्या वतीने येत्या आठवड्यात जिल्हा परिषदची विशेष सभा बोलावून त्या बैठकीत जिल्ह्यातील लोकांसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा मोफत द्याव्यात आणि त्याचे शुल्क शासनाने थेट गोवा शासनाकडे वर्ग करावे, असा ठराव घेतला आहे.’’

श्री. सावंत यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर टीका केली. ‘एकीकडे जिल्ह्यात करोडो रुपयाचा निधी आणला असे केसरकर सांगत आहेत; मात्र प्रत्यक्षात काहीच नाही ही वस्तूस्थिती आहे. 
आरोग्याचा प्रश्‍न ते सोडवू शकत नाहीत. निधीसुध्दा आणू शकत नाहीत. त्यामुळे चांदा ते बांदा या योजनेसाठी खर्च केलेला निधी हा जिल्ह्यातील रुग्णाच्या आरोग्यासाठी वापरावा. श्री. जठार यांनी गोवा शासनाने फी आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे, असे खास पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते; त्याचे काय झाले? असा प्रश्‍न करून उगाच टिमक्‍या मारण्यापेक्षा लोकांचा आरोग्याशी निगडित प्रश्‍न सोडवा.

ते पुढे म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. गावागावांत कमिट्या स्थापन करण्यात येणार आहे.’’
या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, केतन आजगावकर, सत्या बांदेकर, मंदार नार्वेकर आदी उपस्थित होते.

 

Web Title: Sindhudurg News Sathish Sawant Press