सावंतवाडी रुग्णालयाची स्थिती ‘नाजूक’

सावंतवाडी रुग्णालयाची स्थिती ‘नाजूक’

सावंतवाडी - रिक्त पदांमुळे येथील उपजिल्हा रुग्णालाची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. या आधीही पाठपुरावा केलेल्या रिक्त पदांची समस्या आता तरी सुटणार का? याकडे सर्वाचे लक्ष आहे. रुग्णालयात अद्यापही वेगवेगळी २६ पदे अद्यापही रिक्त आहे. गेल्या पाच वर्षात रिक्त पदे भरण्याऐवजी कार्यरत पदेच रिक्त केली 
गेली आहेत.

रिक्त पदांमुळे उर्वरीत रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यावर प्रचंड ताण निर्माण होत आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी येथील भाईसाहेब सावंत वैद्यकिय महाविद्यालयातील असलेले विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून रुग्णांची तपासणी करत आहेत. त्यात २०१२ पासून नियुक्त केलेले वैद्यकिय अधिकारीही गैरहजर आहेत. 

वैद्यकिय अधिकाऱ्यांची वर्ग २ ची ४ पदे, अधिकाऱ्यांची वर्ग ३ चे १ पदे रिक्त आहे. या रिक्त पदासाठी रग्णालयाकडून पाठपुरावा केला; मात्र रुग्णांना योग्य व पुरेशा वैद्यकिय सेवा मिळत नसल्यामुळे उपोषणास बसण्याची वेळ येत आहे हे दुर्देव म्हणावे लागेल. सद्यस्थितीत रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत, हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजीत चितारी आणि स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर हेच रुग्णालयाचा कारभार सांभाळत आहेत. यात रिक्त पदामुळे चारही वैद्यकिय अधिकाऱ्यावर ताण येत आहे. त्यातच २०१२ पासून गेली पाच वर्षे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांतर्फे वेळोवेळी पाठपुरावा केला; मात्र कोणत्याही 
प्रकारची ठोस कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांनतर २०१४ व डिसेंबर २०१५ ला निवेदन दिले. आता नुकतेच दोन महिन्यापूर्वीच निवेदन पाठविले असल्याचे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक उत्तम पाटील यांनी सांगितले. दरम्यान येथे नियुक्त असलेले काही महत्वाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील इतर शासकिय रुग्णालयात नियुक्त केले. यात डॉ. ज्ञानेश्‍वर ऐवाळे व डॉ. निवेदिता तळणकर यांना दोडामार्ग येथे पाठविले. वैद्यकिय अधिकाऱ्यासोबतच इतर म्हणजेच भौतिकोपचारतज्ञ १, रक्तपेढी तंत्रज्ञ १ पद, औषध निर्माण अधिकारी २ पदे, प्रशासकिय अधिकारी वर्ग १ पद, वरिष्ठ लिपिक १ पद, कनिष्ठ लिपिक २ पदे, रक्तपेढी परिचर २ पदे, कक्षसेवक १ पदे अशी विविध पदे अद्यापही रिक्त आहेत.

ही पदे भरण्याबाबतही कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. दरम्यान अपघात विभागातीलही एक महत्वाचे पद रिक्त आहे. अधीक्षक व स्त्रीरोगतज्ञ डॉ. दुर्भाटकर यांना सोडले तर बाह्यरुग्णांचा अतिरिक्त भार रुग्णालयातील डॉ. सावंत व डॉ. चितारी यांच्यावर येत आहे. ८ तासाची सेवाकाल हा २४ तास देण्याची वेळ या वैद्यकिय अधिकाऱ्यावर येत आहे. अलिकडेच रुग्णालयात तापसरीचे रुग्णांच्या वाढत्या संख्येमूळे हा ताण आणखीच वाढला आहे. याकडे मात्र गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि आरोग्यमंत्री दीपक सांवत यांनी पुर्णतः कानाडोळाच केल्याचे समजते.

रूग्णालयावर ताण
रुग्णालयात शहरासोबतच ग्रामीण भागातून प्रचंड रुग्ण मोठ्या संख्येत येतात; मात्र फक्त चारच वैद्यकिय अधिकारी असल्याने रुग्ण तपासणीची प्रक्रिया बराच वेळ चालते. त्यातच बाह्यरुग्ण तपासणीस असलेल्या दोन वैद्यकिय अधिकाऱ्यावर प्रचंड ताण निर्माण होतो.

रुग्णालयाची ड्युटी ८ तासाची असली तरी रुग्णालयासाठी २४ तास अपडेट राहण्याची वेळ येते. तातडीचे उपचार देण्यासाठी रुग्णालयात केव्हाही धाव घ्यावी लागते. चारच वैद्यकिय अधिकारी आहेत. त्यात रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी दुसऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्याचा पर्याय म्हणूनही कोणच नाही. क्षणभर आराम घेणेही काही वेळा अवघड बनते.
- डॉ. अभिजित चितारी, 
वैद्यकीय अधिकारी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com