सावंतवाडीतील बंदीवान ओरोसला हलविणार

अमोल टेंबकर
मंगळवार, 6 मार्च 2018

सावंतवाडी - संस्थानकालीन वारसा असलेल्या येथील जिल्हा कारागृहात जेल टुरिझम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लवकरच येथील बंदीवान ओरोस येथे हलविण्यात येणार आहेत. पर्यटकांना कोठडीत राहण्याचा अनुभव या पर्यटनातून घेता येईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याला निश्‍चितच प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास जेल प्रशासनाला आहे. 

सावंतवाडी - संस्थानकालीन वारसा असलेल्या येथील जिल्हा कारागृहात जेल टुरिझम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लवकरच येथील बंदीवान ओरोस येथे हलविण्यात येणार आहेत. पर्यटकांना कोठडीत राहण्याचा अनुभव या पर्यटनातून घेता येईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याला निश्‍चितच प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास जेल प्रशासनाला आहे. 

शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजूला असलेल्या जागेत संस्थानकालात १८५६ मध्ये कारागृह उभारले होते. त्यानंतर कालातंराने त्याचा वापर सैनिक ट्रेनिंग स्कुल म्हणून करण्यात आला. बाहेरून येणाऱ्या लोकांना आराम करण्यासाठी त्याचा वापर केला जावू लागला. त्यानंतर येथील तहसिलदार आणि तत्कालीन मामलेदारांकडून ट्रेझरीसाठी याचा वापर झाला. त्यानंतर पुन्हा हे जिल्हा कारागृह म्हणून घोषित करण्यात आले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बंदीवानांना ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात येवू लागला. 

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. त्याचा फायदा घेवून येथे येणाऱ्या पर्यटकांना वेगळा अनुभव यावा, या उद्देशाने जेल टुरीझम ही संकल्पना मी मांडली होती. त्याला आता निश्‍चितच मुर्त स्वरूप येईल. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. या कारागृहाला संस्थानकालीन वारसा आहे. त्याचा लाभ पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना देण्यात येणार आहे.
- दीपक केसरकर,
पालकमंत्री

संस्थानकालीन रचना असलेले हे कारागृह बंदीवानांना अपुरे पडत आहे. त्याची बांधणी जुनी असल्यामुळे आंबोली बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली लोकरे हा पळून गेला होता. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जिल्ह्यात ओरोस येथे आता नव्याने कारागृह उभारले आहे. सद्यस्थितीत त्याचा वापर सुरू झाला आहे. त्या कारागृहाची क्षमता दिडशे कैद्यांची आहे. त्यामुळे यापुढे ओरोस येथील कारागृह नियमित वापरात आणण्यात येणार आहे. नवे कारागृह उभारल्यानंतर जुन्या आणि संस्थानकालीन कारागृहाचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

कसे असेल जेल टुरिझम 
ही संकल्पना राबविताना त्याठिकाणी जेलचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ‘फिलिंग द जेल’च्या धर्तीवर कैद्याचे कपडे, कैद्याला दिले जाणारे जेवण, जमिनीवर झोपणे, व्यायाम, प्रार्थना आदींसह कोठडीत राहण्याची मजा, बाजूला जेलर व अन्य अधिकारी हे सर्व काही अनुभवता येणार आहे. प्राथमिक टप्प्यात यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

कसे आहे कारागृह?
जिल्हा कारागृह म्हणून दर्जा असलेल्या सावंतवाडी येथील कारागृहात एकूण बारा कोठड्या आहेत. त्यात महिलांसाठी स्पेशल दोन कोठड्यांची सोय आहे. प्रार्थना हॉल, धान्याचे कोठार आदींसह विहीर, मंदिर यांसह कारागृहाच्या संरक्षक कठड्याच्या आत असलेल्या जागेत शेतीही पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

या इमारतीचे काय होणार अनेक प्रश्‍न होते; मात्र खुद्द कारागृह प्रशासनानेच यात वेगळी संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून ती आता येत्या काही काळात प्रत्यक्षात येणार आहे.
याबाबत येथील कारागृह विभागाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता याठिकाणी जेल टुरीझमला मान्यता दिली असून तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या काळात तो प्रत्यक्षात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडीच्या कारागृहात असलेले बंदीवान आता ओरोस येथील कारागृहात हलविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Web Title: Sindhudurg News Sawantwadi Jail Tourism special