सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे भेट देत पाहणी केली.

सावंतवाडी - सिंधुदुर्गासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील कुटिर रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येथे जागा या प्रकल्पाच्या निकषाइतकी नसल्याने उपलब्ध जागेचे एकत्रीकरण व चार मजली इमारतीचा तोडगा काढला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी येथे भेट देत पाहणी केली.

गेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले; मात्र ते कुठे उभारायचे हे निश्‍चित झाले नव्हते. पालकमंत्री हा प्रकल्प सावंतवाडीत उभारण्यास आग्रही होते. त्यांनी कुटिर रुग्णालयाच्या जागेची पाहणी करून देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. आरोग्य संचालक नितीन बिलोलीकर यांनी या ठिकाणी भेट देत जागेची पाहणी केली.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय चाकूरकर, कुटिर रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील, नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, डॉ. अभिजित चितारी, संदीप सावंत, पालिकेचे अभियंता तानाजी पालव, बांधकाम अभियंता अनिल पाटील यांच्याशी एकत्रित चर्चा केली. ही जागा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी योग्य असल्याचा दावा बिलोलीकर यांनी केला.

याबाबतची माहिती त्यांनी नगराध्यक्ष साळगावकर व दूरध्वनीद्वारे पालकमंत्री केसरकर यांना दिली. यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्‍यक असलेली जागा या ठिकाणी आहे; मात्र सध्या वापरात असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, शवविच्छेदन खोली हा भाग हलवावा लागणार आहे. रस्त्याच्या बाजूला असलेला धन्वंतरी बंगल्याची जागा आरोग्य विभागाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येतील, असे बिलोलीकर यांनी सांगितले.

पुढची पन्नास वर्षे डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. त्यात अनेक सुखसोयी दिल्या जातील. त्यासाठी भविष्यात अन्य सुविधा देण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे.
-  नितीन बिलोलीकर,
आरोग्य संचालक

कसे असेल रुग्णालय?
मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल चार मजली असणार आहे. सध्या वापरात असलेली ऐतिहासिक मुख्य इमारत तशीच ठेवण्यात येणार आहे. त्या बाजूच्या जागेवर अन्य इमारती उभारण्यात येणार आहेत. तहसीलदारांचा बंगला असलेली जागा तेथील अतिक्रमण हटवून ताब्यात घेणार तर मागच्या बाजूने जे. जे. मेडिकल समोरून दुपदरी रस्ता करण्यात येईल.

मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी कुणकेरी, वेत्ये आणि कुटिर रुग्णालय अशा तीन जागा पाहण्यात आल्या. समितीला यात कुटिर रुग्णालयाची जागा योग्य वाटली. तसा अहवाल समितीमार्फत पाठविला जाणार आहे. अंतिम निर्णय आरोग्यमंत्री व पालकमंत्रीच घेतील.’’
- डॉ. उत्तम पाटील, 

अधीक्षक, कुटिर रुग्णालय

Web Title: Sindhudurg News Sawantwadi Multi specialty Hospital