सेंद्रियच्या नावावर होणारी बोगस खत विक्री रोखा
सावंतवाडी - सेंद्रियच्या नावावर ग्रामीण भागात बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्यांना रोखा, अशी मागणी आज येथे पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य संदीप गावडे यांनी केली.
सावंतवाडी - सेंद्रियच्या नावावर ग्रामीण भागात बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्यांना रोखा, अशी मागणी आज येथे पंचायत समितीच्या बैठकीत सदस्य संदीप गावडे यांनी केली. खासगी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना सूचना करा, फिरत्या विक्रेत्यांना रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा, असे आदेश सभापती रवी मडगावकर यांनी दिले.
येथील पंचायत समितीची मासिक बैठक आज येथे झाली. चर्चेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित सदस्यांनी फैलावर घेतले. शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि खते वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे बोगस विक्री करणारे शेतकऱ्यांची फसवणूक करतात. याकडे उपस्थित सदस्यांनी लक्ष वेधले. यावेळी उत्तर देणारे कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी आम्ही प्रतिष्ठित शेतकऱ्यांपर्यंत पोचतो, असे सांगितले. या एका शब्दावरून त्यांना उपस्थित सदस्यांनी धारेवर धरले.
सदस्य मनीषा गोवेकर आणि संदीप नेमळेकर यांनी कृषी विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधींना किंमत देत नसल्याचे सांगितले. आम्ही लोकांच्या मागण्या घेऊन येत आहोत. त्यामुळे त्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा सदस्यांनी दिला.
तालुक्यातील पाणीटंचाईवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या चाळीसहून अधिक प्रस्तावांपैकी फक्त सात प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी राणे यांनी दिली. यावर उपस्थित सदस्य शीतल राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली.
एसटी पास मिळणार शाळा-महाविद्यालयांत
एसटीचे नवे अधिकारी एस. बी. सय्यद यांनी यावर्षीपासून मुलांना लागणारे पास शाळेत किंवा महाविद्यालयात उपलब्ध केले असल्याचे सांगितले. त्यांच्या या अभिनव कल्पनेचे उपस्थित सदस्यांकडून स्वागत झाले. यावेळी बांदा ते रेल्वेस्टेशन व तेथून सावंतवाडी अशी नवी गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली.