समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मालवण विधानसभा मतदार संघातून त्यांनी 1995 मध्ये नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजारपेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात ते पुढे असायचे. 

सावंतवाडी : जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे आज येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव गोरेगाव (मुंबई) येथे नेण्यात येणार आहे. 
दुखंडे हे माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांचे निकटचे सहकारी. ते गेली काही वर्षे मुंबईहून सावंतवाडीत स्थायिक झाले होते. आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी उर्मिला, कन्या सोनाली आणि दोन मुले संतोष आणि संदीप हे आहेत.

गोपाळरावांचे वडील गिरणी कामगार होते. लहानपणापासून परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. गोरेगावहून ते सकाळी भिवंडी कॉलेजला नोकरीसाठी जात असत, आणि तिथून सुटल्यानंतर जनता दल, छात्रभारती आणि इतर सामाजिक, राजकीय कामासाठी वेळ देत असत. युक्रांद या युवक चळवळीमधून त्यांनी कामाला सुरवात केली होती. कोकणाच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आस्था असलेले ते होते. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजारपेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात ते पुढे असायचे. त्यांनी कोकण रेल्वे जनाधिकार समितीची स्थापना केली होती.

मालवण विधानसभा मतदार संघातून त्यांनी 1995 मध्ये नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरीत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांच्या मदतीने त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.

रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा, त्यावेळचे महापालिका उपायुक्त गो. रा. खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन, गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वा खाली काढलेला चड्डी- बनियान मोर्चा, भारतमाता सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन, नामांतर लढा,मंडल आयोग स्थापन करण्या साठी झालेल्या प्रत्येक लढाईत प्रा.दुखंडे पुढे असत. जनता दलाचे ते काही काळ प्रदेश सेक्रेटरी होते.
काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते.या वयातही ते सिंधुदुर्गात होणार्‍या सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत असत. त्यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत आणले जाणाप आहे. उद्या सकाळी गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर मधील त्यांच्या घरा पासून अंत्ययात्रा निघेल. त्यांची दोनही मुले परदेशात असल्याने अंत्यसंस्कार उद्या सायंकाळी 5 वाजता होतील

Web Title: sindhudurg news sawantwadi socialist gopalrao dukhande demise