सावंतवाडी महोत्सवात मेवुंडीच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

सावंतवाडी - येथील पालिकेतर्फे आयोजित पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. 

सावंतवाडी - येथील पालिकेतर्फे आयोजित पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. पर्यटन महोत्सवात आवाजाचे बादशहा सुरेश भोसले यांनीही चिमुकल्यांसोबत धम्माल केली. 

पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीची नृत्यांगना स्मृतिरेखा दास यांचा ओडिसी नृत्याचा कार्यक्रम झाला. या वेळी अनेक कलाकारांनी ओडिसा येथील संस्कृती व कला याठिकाणी सादर केली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी साक्षाकार प्रॉडक्‍शन प्रस्तुत गाण्याने, मालवणी सुरांच्या गजाली या मालवणी कार्यक्रमाने सर्वांना खळाळून हसविले. कार्यक्रमातील कलाकारांनी मालवणी संस्कृतीवर आधारित गाण्यांच्या चालीवर कार्यक्रम सादर केले. यामध्ये दशावतार व लग्न आदी प्रकार सादर केले.

त्यानंतर पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाने संगीत क्षेत्रातील श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवले. मेवुंडी यांच्या गायनातील आलाप व ताना तसेच त्यांना संगीतसाथ देणाऱ्या सर्वांनीच छाप पाडली. उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी कलाकारांचे स्वागत केले. त्यानंतर जोग रागातील ‘साजन मोरे घर आयो’ या बंदिशीने पंडित मेवुंडी यांनी सुरवात केली. त्यांना तबला-निखिला चिंचुरकर, ऑर्गन-अमित पाध्ये, 

बासुरी-देवप्रिया चटर्जी, हार्मोनियम-अदिती गराटे, पखवाज-प्रथमेश तळवलकर यांनी संगीतसाथ दिली. बासुरीवादक देवप्रिया चटर्जी यांनी मेवुंडी यांच्या गाण्याला उत्तम साथ देत सर्वांच्या मनात जागा मिळवली. जयतीर्थ यांनी तराना, तडफे जैसे जलबिन मछलिया हे गाणे सादर करतानाच `भवानी दयानी’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.

Web Title: Sindhudurg News Sawantwadi Tourism festival