वेंगुर्ले बंदरात ७ होड्या बुडाल्या

वेंगुर्ले बंदरात ७ होड्या बुडाल्या

वेंगुर्ले - ओखी वादळाच्या तडाख्यानंतर येथील किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून तुफानसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास येथील बंदरात नांगरून ठेवलेल्या ७ फायबर होड्या समुद्रात बुडाल्याने सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. यात मान्सूनसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पहाटेनंतर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

केरळ व तामिळनाडू किनाऱ्यावर आलेल्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम येथील किनारपट्टीवर जाणवत आहे. याचा फटका भागातील मच्छिमार, रहिवाशांना बसला आहे. काही ठिकाणी वस्तीत पाणी घुसण्याची, मच्छीमारांची जाळी वाहून जाण्याचे प्रकार काल (ता. ४) घडले. दरम्यान मध्यरात्री व आज पहाटेच्या सुमारास बोटी वाहून गेल्या आहेत. मोठ्या बोटींवर बफ, खलाशी व इतर सामान ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ७ फायबर बोटी बंदरात बुडाल्या. यामध्ये हर्षल रेडकर यांची गणपती कृपा, सुविधा रेडकर यांची ओम हरी कृष्ण, प्रल्हाद केळुसकर यांची ब्राह्मण कृपा, मोजेस फर्नांडीस यांची आवेमारीया, कैतान फर्नांडीस यांची नोवा, पांडुरंग मालवणकर यांची धन्वंतरी, आनाजी तांडेल यांची माऊली आदींचा समावेश आहे. प्रत्येकी ३० ते ३५ हजार किमतीच्या होड्या असल्याने सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

आज सकाळी तहसीलदार शरद गोसावी, मंडल अधिकारी व्ही. एम. तुळसकर, तलाठी व्ही. एन. सरवदे यांनी पहाणी केली. गोसावी यांनी मत्स्य विभागास पंचनाम्याचे आदेश दिले. वसंत तांडेल, प्रल्हाद केळुसकर, बाबी रेडकर, मनोहर तांडेल, मोजेस फर्नांडीस यांसह मच्छिमार उपस्थित होते.
तालुक्‍यात सकाळपासून वेगाने वारे वहात होते. हलक्‍या सरी कोसळत आहेत. येथील प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे.

समुद्राचे रूप पाहण्यासाठी गर्दी
येथील बंदरामध्ये आज रात्रीपासून पाण्याची पातळी वाढण्याचे प्रकार घडत आहेत. हे दृश्‍य पहाण्यासाठी बंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. आज सकाळी नागरिकांनी लाटा पहाण्यासाठी गर्दी केली; मात्र दुपारी साडेबारानंतर वाऱ्याचा वेग वाढून लाटाही मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर धडकू लागल्याने पोलिसांनी सावधानतेचा इशारा देत बंदरावरील अतिउत्साही नागरिकांना लाटांच्या जवळ जाण्यास मज्जाव केला.

देवगडच्या आश्रयाला ३१० ट्रॉलर्स
देवगड - ‘ओखी’ वादळामुळे सर्वार्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील बंदरात आतापर्यंत जिल्ह्याबाहेरील सुमारे ३१० मच्छीमारी ट्रॉलर दाखल झाले आहेत. वादळामुळे किनारपट्टीवरील वातावरण बदलले असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. पोलिस व महसूल प्रशासन बंदरावर कार्यरत आहे.

येथील बंदरात केरळ, तामिळनाडू, ओरिसा, पश्‍चिम बंगाल तसेच गुजरात येथील मच्छीमारी नौका आश्रय घेतला आहे. काल (ता. ४) रात्रीपर्यंत जिल्ह्याबाहेरील सुमारे २९० मच्छीमारी ट्रॉलर दाखल झाले होते. समुद्र खवळलेला राहण्याची शक्‍यता असल्याने तसेच किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढल्याने बंदरात बाहेरील नौकांची गर्दी वाढू लागली आहे. आज समुद्र खवळलेला असल्याने सकाळपासून ट्रॉलर बंदरात येण्याचे सत्र सुरूच होते. सायंकाळपर्यंत आणखी सुमारे २० ट्रॉलर बंदरात दाखल झाले. त्याने ट्रॉलरची गर्दी झाली आहे.

सुरक्षितता म्हणून बंदरावर महसूल प्रशासनाकडून आपत्ती कक्षाची स्थापना केली आहे. आरोग्य विभाग पथकही कार्यरत होते. पथकाकडून २२ मच्छीमारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बंदरावर प्रांत नीता सावंत-शिंदे, तहसीलदार वनिता पाटील तसेच अन्य महसूल कर्मचारी कार्यरत होते. अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी बंदरावरील सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण, निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी उपस्थित होते. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. 

आवश्‍यक वाटल्यास महसूलतर्फे ट्रॉलरवर इंधन पुरवठा करण्यात येईल. सोमवारी रात्रीपासून किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला होता. खवळलेल्या समुद्राची गाज वाढली होती. त्यामुळे मच्छीमारांनी बंदरात राहणे पसंत केले. पहाटेपासून वादळी वाऱ्याबरोबरच पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा सुटल्याने वातावरणात गारवा आला होता. अधूनमधून विजेचा लपंडाव सुरू होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com