मांगेलीत दोनशे वर्षांनी गाव शिमगोत्सवासाठी एकवटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

दोडामार्ग - तब्बल दोनशेपेक्षा अधिक वर्षांनंतर मांगेलीत पूर्ण गाव एकत्र होऊन यावर्षी होळी सण साजरा करणार आहे. सगळ्या वाड्या, सगळे मानकरी यांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. १) होळी घातली. यापुढचे सगळे कार्यक्रम, न्हावण, रोंबाटही संपूर्ण गाव मिळून मिसळून सगळ्या वाड्यांवर होणार आहेत. मांगेलीची ही एकी अभूतपूर्व आणि अनेक गावांसाठी दिशादर्शक आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला मांगेली हा गाव. पायथ्याला सखल भागात कुसगेवाडी व देऊळवाडी तर उंच भागात तळेवाडी आणि फणसवाडी. गावात वाद अथवा तंटा नाही; पण शेकडो वर्षांपासून पिढ्यान्‌पिढ्या आपापल्या वाडीवर शिमगोत्सव साजरा करायचे. अगदी देवाचे न्हावणही तुळशीकडेच घेतले जायचे. कोकणातील परंपरेनुसार न्हावण गावातील घराघरात वाटले जाते. देवळातही असते. रोंबाटही घरोघरी नेले जाते; पण मांगेलीत मात्र वाड्यावाड्यांवर आणि काही घरांच्या समूहामध्ये शिमगोत्सव साजरा व्हायचा. जुन्या जाणत्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार दोनशेपेक्षाही अधिक वर्षांनी प्रथमच सगळ्या वाड्या, सगळे मानकरी एकत्र येऊन यावर्षी एकोप्याने शिमगोत्सव साजरा करत आहेत.

जवळपास अकरा मानकरी आणि एक त्रयस्थ मानकरी असे बाराजण एकत्र येऊन यावर्षीचा शिमगोत्सव साजरा करणार आहेत. त्या सर्वांनी एकत्र येत होळी घातली. गावात सर्वांनी मिळून जवळपास आठ ठिकाणी होळ्या उभारल्या आहेत. शिवाय न्हावणाचा कार्यक्रमही संपूर्ण गाव मिळून करणार आहे. यावर्षी रोंबाट नृत्यही सगळ्या वाड्यावर जाणार आहे आणि विशेष म्हणजे इतकी वर्षे पाच दिवस चालणारा मांगेलीचा शिमगोत्सव यावर्षी सात दिवस असणार आहे. न्हावण कार्यक्रम, रोंबाट नृत्य याचे वाडीवस्तीनुसार नियोजन करण्यात आले आहे. सगळ्या गावाचा एकत्रित शिमगोत्सव कित्येक पिढ्यांनंतर साजरा होणार असल्याने मांगेलीत सध्या हर्ष आणि उल्हासाचे वातावरण आहे.

Web Title: Sindhudurg News Shimagoushav in Mangeli after 200 years