रायगडावर 24 पासून शिवराज्याभिषेक सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

कुडाळ - रायगड जिल्हा परीषद, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि महाराष्ट्रातील विविध शिवप्रेमी संघटना यांच्या सहयोगाने श्री शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे 24 व 25 जूनला किल्ले रायगडावर होणार असल्याची माहिती उत्सवाचे शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली.

कुडाळ  - श्री शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे 24 व 25 जूनला किल्ले रायगडावर होणार असल्याची माहिती उत्सवाचे शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. रायगड जिल्हा परीषद, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि महाराष्ट्रातील विविध शिवप्रेमी संघटना यांच्या सहयोगाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

शिवराज्याभिषेकाचे हे 345 वे वर्ष असून समितीद्वारे गेली 23 वर्ष हा सोहळा आयोजित होत आहे. यंदा या कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यात भोर येथील हिरडस मावळचे सरदार रायाजी बांदल यांचे वंशज रामचंद्र बांदल यांचा शिवसन्मान होणार आहे. प्रमुख पाहुणे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष रणजितराव सावरकर हे उपस्थित राहणार आहेत.

24 ला सकाळी 9 वाजता गडदेवता शिर्काई देवीचे पूजन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी राजदरबार येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान होणार, सकाळी 11 वाजता व्याडेश्‍वर व्याडेश्वर पूजन होईल. दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत जगदिश्‍वर पूजन निमंत्रीत दाम्पत्यांच्या उपस्थितीत होईल.

सायंकाळी 5 वाजता शिवप्रतिमेच्या शिवतुलादानाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध संबळ वादक अभिजित रेणके यांच्या पथकाचा पारंपारीक गोंधळाचा कार्यक्रम होईल. रात्री 8 वाजल्यापासून राजदरबार येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पोवाडे, ऐतिहासीक गाणी यांचे सादरीकरण होईल.

25 ला सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळा, नगारखान्यासमोरील भव्य ध्वजाचे ध्वजारोहण, सिंहासनारोहणानंतर भोर येथील हिरडस येथील सरदार रायाजी बांदल यांचे वशंज रामचंद्र बांदल यांचा शिवसन्मान सोहळा, जिल्हा परिषद शेड जवळ महाप्रसाद, गडस्वच्छता होईल. या कार्यक्रमात प्लास्टीकमुक्त रायगड ही मोहीम, असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.

Web Title: SIndhudurg News Shivrajyabhishekh Sohala on Raigad