माटणेत शिवसेनेचा एकतर्फी विजय

दोडामार्ग ः माटणे पोटनिवडणुकीतील विजयानंतर शिवसैनिकांनी बाबुराव धुरी यांना उचलून घेत जल्लोष केला.
दोडामार्ग ः माटणे पोटनिवडणुकीतील विजयानंतर शिवसैनिकांनी बाबुराव धुरी यांना उचलून घेत जल्लोष केला.

दोडामार्ग - तालुक्‍यातील माटणे पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी जाहीरपणे, तर कॉंग्रेसशी छुपी आघाडी करुनही शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवत भाजपकडील माटणेची जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले.

सर्व पक्षांची मोट बांधून शिवसेनेला धडा शिकवायला निघालेल्या भाजपला शिवसेनेने 685 मतांची आघाडी घेऊन धुळ चारली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांना 1736 तर भाजप आघाडीच्या रुपेश गवस यांना 1051 मते मिळाली. कॉंग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सदस्य भरत जाधव केवळ चार मतांनी विजयी झाले होते. त्यांना 929 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे अंकुश गवस यांना 925 मते मिळाली होती. त्यानंतर जूनमध्ये जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आणि माटणेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी काल (ता.13) मतदान झाले.

भाजपने "स्वाभिमान' शी आघाडी केली होती, तर शिवसेना आणि कॉंग्रेस स्वतंत्र लढत होती; मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने कॉंग्रेसशी हातमिळवणी करुन शिवसेनेसमोर आव्हाने उभे करण्याचा प्रयत्न केला होता. फेब्रुवारीमधील निवडणुकीत रामचंद्र ठाकूर यांना 604 मिळाली होती तर या निवडणुकीत सत्यवान गवस यांना केवळ 80 मते मिळाली. त्यामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कॉंग्रेससाठी काम केले नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. शिवसेना कार्यकर्त्यांना विजयाची खात्री होती. त्यामुळे तहसीलसमोर त्यांनी गर्दी केली होती. श्री. धुरी यांना 2992 पैकी 1736 मते मिळाल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. श्री. धुरी बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले. त्यानंतर येथील चौकात फटाक्‍यांची आतषबाजी करुन त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. श्री. धुरी यांनी सभापती गणपत नाईक, पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, जिल्हा उपाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, प्रकाश परब आणि अनेक कार्यकर्त्यांसह येथील पिंपळेश्‍वराचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण पंचायत समितीत गेले. तेथे त्यांचे सभापती नाईक, सदस्या सौ. गवस यांनी स्वागत केले.

कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शन
या निवडणुकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकजूट दिसली. जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक संजय गवस, विभागप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, नगरसेवक संतोष म्हावळणकर व दिवाकर गवस, महादेव कुबल, सज्जन धाऊसकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पाचही गावातील युवक, मतदार, उसपचे सरपंच आणि सहकारी यांनी एकजुटीने विजयासाठी मेहनत घेतली.

भरत जाधव यांना विजय समर्पित
आपण आपला हा विजय आपले मित्र (कै.) भरत जाधव यांना समर्पित करतो असे सांगून श्री. धुरी यांनी हा विजय आपला नसून पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पाचही गावातील मतदार आणि कार्यकर्ते यांचा असल्याचे स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक आणि प्रकाश परब यांची प्रेरणा आणि समर्थ साथ यामुळे सगळे विरोधक शिवसेनेविरोधात एक होऊनही आपण जिंकू शकलो असेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com