सिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छतेच्या चक्रव्यूहात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

मालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

मालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीतर्फे दोन वर्षांपासून कर आकारणी होते. पहिल्याच वर्षी कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; मात्र या पर्यटन हंगामात स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छतागृहांना पाणी तसेच अन्य सुविधांकडे लक्ष न दिल्याचे चित्र आहे. 

सद्यःस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर रोज पाच ते सहा हजार पर्यटकांची ये-जा सुरू आहे. कर घेऊनही पर्यटकांना कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. किल्ल्यातील फिरती शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. काही शौचालयांत पाण्याअभावी अस्वच्छता आहे. परिणामी किल्ल्यात दुर्गंधी होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यासंदर्भात ग्रामसेवक श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किल्ला रहिवाशांनी केला. अस्वच्छतेसंदर्भात वायरी भुतनाथचे ग्रामसेवक एस. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

शौचालयांना पाण्याची सुविधा 
किल्ल्यात पर्यटकांसाठी उभारलेल्या फिरत्या शौचालयांना पाण्याची सुविधा नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यातील तलावांची दुरुस्ती करून पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शौचालयांसाठी होऊ शकतो. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत. 

Web Title: Sindhudurg News Sindhudurg Fort Dishonesty issue